चिपळूण ः चिपळुणात भाजीमंडईतील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळुणात भाजीमंडईतील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
चिपळूण ः चिपळुणात भाजीमंडईतील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

चिपळूण ः चिपळुणात भाजीमंडईतील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

sakal_logo
By

फोटो - ratchl२९३.jpg ःKOP२२L५३४३४
चिपळूण ः भाजीमंडई आवारात पालिकेने भाजी विक्रेत्यांवर केलेली कारवाई.

चिपळूण मंडईतील अतिक्रमणावर कारवाई
व्यापाऱ्यांचे साहित्यही जप्त ; जेसीबीने खोदाई करून प्रतिबंध
चिपळूण, ता. २९ ः शहरातील महर्षी कर्वे भाजीमंडईच्या आवारात अतिक्रमण केलेल्या भाजीविक्रेत्यावर नगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरूवारी धडक कारवाई केली. येथील सर्व विक्रेत्यांना हटवून त्यांचे साहित्य जप्त केले तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी तेथे जेसीबीने खोदाई केली आहे. या जागेत पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही या विक्रेत्यांना नगर पालिकेने दिला आहे.
सध्या बाजारपेठेतील रस्त्यालगत भाजीविक्रेते व अन्य व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यातच महर्षी कर्वे भाजीमंडईच्या दर्शनी भागात फेरीवाले व भाजीविक्रेत्यांनी अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जून महिन्यात नगर पालिकेने तारेचेच कुंपण घातले. तसेच या जागेत कोणत्याही व्यावसायिकाने अतिक्रमण करू नये, असे आवाहनही केले होते; परंतु त्या ठिकाणच्या भाजीविक्रेत्यांनी नगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न देता आतमध्येच दुकाने थाटली होती. एवढेच नव्हे तर त्या दुकानांवर छत उभारण्याचाही प्रयत्न काहींनी केला होता. हा प्रकार नगर पालिकेच्या लक्षात येताच त्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती; मात्र आता त्याच जागेत पुन्हा अतिक्रमण झाल्याने गुरूवारी नगर पालिकेने ही जोरदार कारवाई केली. या वेळी प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे व अन्य कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

चौकट

ओटे घेण्यास प्रवृत्त करा
गेल्या अनेक वर्षापासून महर्षी कर्वे मंडई इमारत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वादग्रस्त ठरत आहे. अजूनही या इमारतीतील ५२ ओटे व बहुतांशी गाळे रिकामे आहेत. त्यासाठी ९ वेळा लिलाव प्रक्रिया राबवूनदेखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. मूल्यांकनानंतर भाडेदरातदेखील आता घट झाली आहे; परंतु भाजीमंडई आवारातच रस्त्यालगत काहींनी दुकानं थाटली. त्याचा परिणाम आतील गाळे व ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेवर होत आहे. त्यामुळे नगर पालिकेने संपूर्ण बाजारपेठेत अतिक्रमण मोहीम राबवून भाजीविक्रेत्यांना मंडईमध्ये गाळे व ओटे घेण्यास प्रवृत्त करण्याची मागणी केली जात आहे.