कादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार
कादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार

कादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार

sakal_logo
By

rat३०p७. jpg
L५३६०५
कादवणः ग्रामसभेत अनिष्ट विधवा प्रथा बंदबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आला.

कादवणकरांनी केली विधवा प्रथा हद्दपार
ग्रामसभेत ठराव; गावात जनजागृती; महिलांना सन्मानाने वागविण्याची भूमिका
मंडणगड, ता. ३०ः पतीच्या निधनानंतर तिचे कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या न काढता ती आभूषणे कायम ठेवून तिला सुरक्षित केले पाहिजेत. शहराप्रमाणे जुन्या परंपरा मोडीत काढून त्या महिलांना सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थ दिलीप शिंदे यांनी मांडून गावात जनजागृती केली. त्याला शासनाच्या परिपत्रकाची जोड मिळाली आणि सरपंच राजेंद्र सोंडकर यांनी ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव आणला. त्यासाठी माजी सरपंच आशा सोंडकर यांची मदत घेतली. कादवण ग्रामपंचायतीने विधवा प्रथा हद्दपार केली.
चंद्रावर स्वार होणारा विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून भारत देश वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे पालन होते आणि त्यातून विधवांची पिळवणूक केली जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार तालुक्यातील कादवण ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र सोंडकर, उपसरपंच उषा शिंदे आणि ग्रामसभेने घेतला. या निर्णयात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.सभेत ठराव आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, चर्चा झाली. ठरावाच्या बाजूने मतदान घेण्याचा निर्णय झाला. सर्व महिलांसह पुरुषांनी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यात आदर्श घालून दिला आहे. प्रस्तावास सूचक म्हणून आशा सोंडकर तर दीपक हेंद्रे यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर जातीवाचक नाव वगळून गावातील बौद्धवाडीचे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नगर असे नामकरण करण्यात आले.
शिक्षणाची कास धरल्याने प्रत्येक घरातील मुलगी शिकू लागली आहे. सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण जोरात सुरू आहे. गावागावात महिला सरपंच ग्रामपंचायतींचा कारभार यशस्वीपणे करीत आहेत. काही ठिकाणी पुरुषांपेक्षा अधिक सक्षमपणे महिला कारभार करत असल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत महिलांचे अधिकार हे अबाधित ठेवून त्यांना चांगले जीवन, त्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. त्याकरिता सरकारने अनिष्ट प्रथा बंद करण्याची प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी विधवा प्रथा ही एक आहे. पती गेल्यानंतर त्या विधवेला पुढील आयुष्य जगताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यांना कुठलेही सन्मान दिले जात नाही. कार्यक्रमात स्थान दिले जात नाही. आपली मुलगी, नात्यातील मुलगी ही कधीतरी त्या अवस्थेतून जात असते. तिलाही अशी वागणूक मिळाली की, आपल्याला चीड येते आणि समोरच्याशी भांडत असतो. त्यापुढे काही करत नाही; मात्र परक्या मुलींबाबत असा विचार करताना रूढी-परंपरा याचा आधार घेतला जातो,हे बंद केले पाहिजे असे मत मांडण्यात आले.