महामार्गासाठी आणखी साडे सव्वीस कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गासाठी आणखी साडे सव्वीस कोटी
महामार्गासाठी आणखी साडे सव्वीस कोटी

महामार्गासाठी आणखी साडे सव्वीस कोटी

sakal_logo
By

53579
53580
कणकवली ः आणखी निधी मिळाल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांना गती मिळेल.


महामार्गासाठी साडेसव्वीस कोटी

आणखी निधी; ३५ नव्या बसथांब्यांसह सेवा रस्ते, गटारे, सरंक्षण भिंत कामे मार्गी लागणार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः महामार्ग चौपदरीकरणात अपूर्ण राहिलेल्‍या कामांसाठी केंद्राने २६ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यात खारेपाटण ते झाराप या दरम्‍यान नवीन ३५ बस थांब्यांची उभारणी होणार आहे. याखेरीज कुडाळ आरएसएन हॉटेल येथे सर्कल, ठिकठिकाणच्या सेवा रस्त्याचे रूंदीकरण, पाणी वाहून जाण्यासाठी नव्याने गटारे, स्पीड लिमिटचे फलक, संरक्षण भिंती आदींची कामे होणार आहेत.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले; मात्र अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गटारांची बांधकामे झाली. काही भागात सेवा रस्ते रखडले, याखेरीज महामार्गावर पाणी तुंबून दुचाकीस्वार कोसळण्याचेही प्रकार घडले होते. नांदगाव परिसरात तर अतिवृष्‍टी कालावधीत घरांमध्ये पाणी जाऊन नुकसानी होत होती. या सर्व कामांसाठी महामार्ग विभागाने २६ कोटी ५० लाख रूपयांचा आराखडा केंद्राला पाठवला होता. त्‍याला मंजूर मिळाली असून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्णत्‍वास जाणार असल्‍याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली.
नव्या थांब्यांना मंजूरी
महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण ते झाराप या दरम्‍यानचे अनेक बस थांबे इतिहास जमा झाले. यातील काही ठिकाणी बस थांबे उभारण्यात आले; मात्र अनेक गावांच्या ठिकाणी बस थांबे नसल्‍याने प्रामुख्याने पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत होती. आता महामार्गावर नव्याने ३५ ठिकाणी बसथांबे होणार आहेत. यात कणकवली ते झाराप या दरम्‍यान १५ तर जानवली ते खारेपाटण या दरम्‍यान २० ठिकाणी बसथांब्यांची उभारणी होणार आहे.
-----------
चौकट
सेवा रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी
महामार्गावर नांदगाव, कासार्डे, जानवली, खारेपाटण, झाराप आदी ठिकाणचे सेवा रस्ते अपूर्ण राहिले आहेत. यात वाहन चालक विरूद्ध दिशेकडून वाहने चालवत असल्‍याने सातत्‍याने अपघात होत आहेत. त्‍यामुळे आता ज्‍या ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत, त्या ठिकाणी सेवा रस्त्यांचे रूंदीकरण केले जाणार आहे. त्‍यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा महामार्ग विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली.
------------
चौकट
नवी गटारे
महामार्गावर वागदे, कुडाळ, खारेपाटण, झाराप, नांदगाव आदी ठिकाणी पाणी साठून राहते. तर गटार नसल्‍याने काही घरांमध्येही पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी आता महामार्ग दुतर्फा जेथे आवश्‍यक आहेत तसेच जेथे पाणी साठून राहण्याचे प्रकार होतात, तेथे नव्याने गटार बांधकाम होणार आहे. महामार्गाच्या खालून बॉक्‍स कन्व्हर्ट आणि पाईप कर्न्व्हट पद्धतीनेही गटारे बांधली जाणार असल्‍याची माहिती महामार्ग सावंतवाडी विभागाचे उपअभियंता एम. आय. साळुंखे यांनी दिली.
-------------
चौकट
कुडाळ, झाराप, पावशीत नवी कामे
कुडाळ येथील हॉटेल आरएसएन भागात तीन ठिकाणाहून वाहने एकत्र येतात. येथे सातत्‍याने अपघाताही होत आहेत. त्‍यामुळे येथील सेवा रस्त्यालगत सर्कलची उभारणी होणार आहे. झाराप तिठा येथील सेवा रस्ते रूंद केले जाणार आहेत. याखेरीज पावशी तिठा येथील सेवा रस्त्यांचे रूंदीकरण केले जाणार आहे.
------------
चौकट
जानवली पूलाला मंजूरीची प्रतीक्षा
जानवली येथील नदीवर दोन्ही बाजूंनी पादचारी पूल उभारले जाणार आहेत. या पुलांचा आराखडा तांत्रिक मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यात या पुलांना तांत्रिक मंजूरी आणि त्‍यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे महामार्ग विभागाकडून स्पष्‍ट करण्यात आले.
--------------
चौकट
कसाल पूल प्रस्ताव ‘कोकण’कडे
कसाल येथील हायस्कूल परिसरात विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधला जाणार आहे. या पुलाचा आराखडा कोकण भवन येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तेथे या पुलाला तांत्रिक मंजुरी मिळाल्‍यानंतर या पुलाच्या उभारणीची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महामार्ग उपअभियंता श्री.साळुंखे यांनी दिली.
----------
चौकट
कणकवली उड्डाणपूल जोडरस्ता बांधकाम
कणकवलीतील उड्डाणपूल जोडरस्ता गेली दोन वर्षे खचत असल्‍याने महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. १ ऑक्‍टोबरपासून येथील जोडरस्ता हटवून नव्याने बांधकाम करण्याचे नियोजन होते; मात्र पावसाळा असल्‍याने आता दिवाळीनंतर येथील जोडरस्त्याचे बांधकाम कोसळून तेथे नवीन बांधकाम केले आहे. त्‍यासाठी महामार्गावरील एका बाजूची वाहतूक फोंडाघाट, हरकुळ मार्गे वळवली जाणार आहे. त्‍याबाबतचे नियोजन सुरू असल्‍याची माहिती महामार्ग विभागाने दिली.