मालाची गुणवत्ता, सचोटी, ग्राहकसेवा ही यशाची सुत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाची गुणवत्ता, सचोटी, ग्राहकसेवा ही यशाची सुत्रे
मालाची गुणवत्ता, सचोटी, ग्राहकसेवा ही यशाची सुत्रे

मालाची गुणवत्ता, सचोटी, ग्राहकसेवा ही यशाची सुत्रे

sakal_logo
By

rat३०P२५.JPG
५३६१५
देवरूखः येथील आठल्ये-सप्रे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यापुढे बोलताना मंदार ओक.

मालाची गुणवत्ता, सचोटी ही यशाची सुत्रे
व्यवसायिक मंदार ओक ; कर्मचारी व्यवस्थापनही महत्वाचे
देवरूख, ता. ३० ः किराणा पेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायात कालानुरूप फरक पडला आहे; मात्र मालाची गुणवत्ता, सचोटी, ग्राहकसेवा आणि कर्मचारी व्यवस्थापन ही यशस्वी किराणा व्यापाराची किंबहुना सर्वसाधारण व्यापाराची चतुःसूत्री आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील केशव आप्पाजी ओक या पेढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण अभ्यासक मंदार ओक यांनी केले.
येथील आठल्ये-सप्रे महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे मंदार ओक यांची मुलाखत झाली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी वरील प्रतिपादन केले. प्रा. अरविंद कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. चिपळुणातच नव्हे तर जिल्ह्यात केशव आप्पाजी ओक या किराणा पेढीचे मोठे नाव आहे. त्यांची विश्वासार्हता खणखणीत आहे. व्यापारात चढउतार पाहावेच लागले, असे सांगून मंदार म्हणाले, किराणा हा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा व्यवसाय असल्याने अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा आहे. तसेच भांडवल गुंतवणूकही भरपूर लागते. शिवाय उधारी वसुली ही डोकेदुखी असतेच. या पेढीने सदोदित दर्जेदार मालाचा पुरवठा केला. आमच्या पेढीत गुणवत्तेशी तडजोड नाही. सचोटीचा व्यापार हे आमचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ग्राहक सेवा ही सर्वात महत्त्वाची बाब आम्ही मानतो. ग्राहकाला एखादी गोष्ट सांगून पटली नाही, त्याने माल बदलून मागितला, तरीही तो देऊन नंतर त्याचे नेमके काय चुकले आहे हे त्याला समजावून सांगतो. त्यामुळे अनेक पिढीजात गिऱ्हाईकेही आमच्याकडे आहेत. कर्मचारी व्यवस्थापन आमच्यासाठी महत्वाचेच आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच मालक मंडळी आमच्याकडे काम करतात. त्यामुळे कोरोना काळातही आमच्याकडे कर्मचारी होतेच. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांच्याशी असलेले वर्तन याचा मेळ जमला तर व्यवसायात त्याचा फायदा होतो. या व्यवसायात सतत सजग राहून अभ्यास लागतो. दरातील चढउतार, ब्रँडचे भान, स्पर्धकांचा सामना आणि गुणवत्ता राखणे यासाठी बाजारपेठांचा अभ्यास करूनच खरेदी करावी लागते. कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची क्षमता, कामावर येण्याची अनियमितता आदी बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. तसे ते घेतल्यानेच ओक पेढीवर निष्ठावान कर्मचारी ४०-४० वर्षेही काम करत आहेत.

चौकट
यामुळेच टीकला ब्रँड
२०१५ ला आलेला पूर आणि २०१९-२० दोन वर्षांचा कोरोना हा काळ व्यापाराच्या कसोटीचा होता. व्यापाराला या काळात मिळालेल्या फटक्यातून उभे राहण्यासाठी जिद्द आणि उपरोक्त मूल्यांचा अंगीकार केला. त्यामुळेच ओक पेढी हा ब्रँड टिकून आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे विद्यार्थीही खूश झाले.