वेतोशी येथे अपघातात महिला गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेतोशी येथे अपघातात महिला गंभीर
वेतोशी येथे अपघातात महिला गंभीर

वेतोशी येथे अपघातात महिला गंभीर

sakal_logo
By

वेतोशी येथे अपघातात महिला गंभीर
रत्नागिरीः कोतवडे ते जांभरूण जाणाऱ्या रस्त्यात खड्डे आहेत हे माहित असतानाही निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने अपघात झाला. या अपघातात महिला जखमी झाली. संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक देवरूखकर (रा. जांभरूण, पोस्ट वेतोशी, ता. रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास कोतवडे ते जांभरूण जाणाऱ्या वेतोशी मार्गावर घडली. संशयित देवरूखकर हा दुचाकीवर (एमएच-०८-एएम-९१०३) आई गितांजली अशोक देवरूखकर (वय ५८, रा. जांभरूण) यांना घेऊन जात होता. रस्त्यात खड्डे पडलेले आहेत हे माहीत असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवल्याने मागे बसलेल्या त्यांच्या आईचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
------
रोकड पळवणाऱ्या दोघांना अटक
रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करून स्नॅक सेंटरच्या गल्ल्यातील जबरदस्तीने ४ हजाराची रोख रक्कम पळवणाऱ्या दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शाहिद सादीक मुजावर (वय ३२, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर (वय ३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नाव आहेत. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहूल स्नॅक सेंटर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू जयपालसिंग बगेल (रा. मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) या राहूल स्नॅक सेंटर येथे एकटीच असताना यातील दुचाकीवरून (एमएच-०८-एएस-४८९२) जाणारा संशयित शाहीद याने साक्षीदार प्रकाश कुरणे यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला, तर फुरकान याने आम्ही पोलिस आहोत, तुम्ही दुकानात विमल गुटखा ठेवता. आम्ही दुकान तपासायला आलो आहोत, असे सांगितले. जबरदस्तीने दुकानात प्रवेश करून चाकू काढून खुशबू हिला आरडाओरडा केलास तर ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी स्नॅक सेंटरच्या गल्ल्यातील ४ हजार रुपये घेऊन पलायन केले. या प्रकरणी खुशबू बगेल हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी संशयितांना शुक्रवारी (ता. ३०) अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह २६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-------------
कडवई येथील डॉक्टरची फसवणूक
संगमेश्वरः कडवई येथील डॉक्टरांची एका अज्ञाताने २५ हजाराची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली. अज्ञाताविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेनंतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता ऑनलाइन व्यवहार सावधपणे करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी केले आहे. डॉ. मयुरेश विलास पुरोहित (रा. कडवई) यांना बुधवारी (ता. २८) मोबाईल नंबरवरून वीजबिल अपडेट न केल्याने आपले वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा मेसेज आला. त्या मेसेजवर त्यांनी कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने वीजबिल अपडेट करण्याकरिता एक लिंक पाठवली व त्या लिंकवर दहा रुपये भरण्यास सांगितले. लिंकवर पुरोहित यांनी १० रुपये भरले असता त्यांच्या बँक खात्यातून १० हजार , ९ हजार ९९९ व ४ हजार ८०० रुपये असे एकूण २४ हजार ७९९ रुपये रक्कम डेबिट झाल्याचे पुरोहित यांच्या लक्षात आले. पुरोहित यांनी तत्काळ बँक ऑफ इंडियाच्या कडवई शाखेत जाऊन आपले खाते बंद केले व पोलिसात तक्रार दिली.