निवडणुकांसाठी आघाडीचा निर्णय लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकांसाठी आघाडीचा निर्णय लांबणीवर
निवडणुकांसाठी आघाडीचा निर्णय लांबणीवर

निवडणुकांसाठी आघाडीचा निर्णय लांबणीवर

sakal_logo
By

निवडणुकांसाठी आघाडीचा निर्णय लांबणीवर
सावर्डेत राष्ट्रवादीची बैठक ; ध्येयधोरणे लोकापर्यंत पोहचवा
चिपळूण, ता. ३०ः आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुका स्वबळावर लढायच्या की, महाविकास आघाडी. याचा निर्णय अद्याप झाला नसून येत्या काही दिवसांतच तो घेतला जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात झालेली विकासकामे आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेसमोर पोहचवा, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी सावर्डे येथील जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केले.
खासदार तटकरे म्हणाले, पक्षवाढीच्यादृष्टीने तालुका, विधानसभा क्षेत्राध्यक्षस्थानी पक्षाची सभासद नोंदणी वाढवणे गरजेचे आहे. ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवतानाच पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रमही राबवणे आवश्यक आहे. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन महिला जिल्हाध्यक्षांनी करावे. आमदार शेखर निकम यांनी पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. लोकसभा निवडणुकीतील 60 हजाराची पिछाडी भरून काढत या लढवय्याने निवडणूक जिंकण्याचा करिश्मा दाखवला. त्यांनी आमदार निकमांच्या संघटन कौशल्याचा गौरव केला. पोफळी ग्रामपंचायत बिनविरोध केल्याबद्दल दादा साळवी, बाबू साळवी यांचेही अभिनंदन केले. या वेळी माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राजाभाऊ लिमये, कुमार शेटये, चित्रा चव्हाण, दिशा दाभोळकर, प्रकाश शिगवण, अभिजित हेगशेट्ये, जयंद्रथ खताते, पद्माकर आरेकर, विवेक शेरे, स. तु. कदम, राजन दुर्वे, राजू आंब्रे, रामभाऊ गराटे, चैतन्य दळवी आदी उपस्थित होते.
---------
चौकट
तटकरे आल्यावरच बैठकांचा जोर
खासदार सुनील तटकरे हे दौऱ्यावर आल्यानंतरच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे जिल्हा कार्यकारिणीची बैठक नेहमी घेतात. शुक्रवारीही त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आला. तटकरेंशिवाय जिल्हाध्यक्ष जाधव जिल्ह्याची बैठक घ्यायला का धजावत नाहीत, असा सवाल एका पदाधिकाऱ्याने बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. त्यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्येही एकच हशा पिकला.
--------------
चौकट
माजी आमदार रमेश कदमांना केले खुश
राष्ट्रवादीत स्वगृही परतल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांना कोणतेही पद दिले नव्हते. या विषयीची नाराजी त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. सावर्डेतील बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यांची अनुपस्थिती लक्षात येताच प्रदेशपातळीवर फोनाफोनी झाली अन् माजी आमदार कदम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.