‘हक्काचे घर द्या, सोयीसुविधा द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हक्काचे घर द्या, सोयीसुविधा द्या’
‘हक्काचे घर द्या, सोयीसुविधा द्या’

‘हक्काचे घर द्या, सोयीसुविधा द्या’

sakal_logo
By

53693
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मुला-बाळांसह सहभागी कातकरी बांधव.

‘हक्काचे घर द्या, सोयीसुविधा द्या’

कातकरी समाजाची हाक; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः आम्हाला हक्काचे घर द्या, माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला आवश्यक सुविधा द्या यांसह विविध मागण्यांसाठी आणि भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कातकरी बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला. गगनभेदी आवाजात घोषणा व व्यथा मांडणारे गायन करून कातकरी समाजाने प्रशासनाचे लक्ष वेधले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरी जिल्ह्यातील कातकरी समाज आजही दुर्लक्षित राहिला आहे. या समाजाच्या समस्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासन आजही उदासीन आहे. त्यामुळे किती वर्षे आम्ही उघड्यावरच संसार करायचा, असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील कातकरी व समाजाचे नेतृत्व करणारे उदय आईर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पारंपरिक वेशात ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. या मोर्च्यात कातकरी समाजाच्या शेकडो महिला, पुरुषांनी आपल्या छोट्या मुलांसह सहभाग घेतला होता. शिस्तबध्द आणि नियोजित वेळेत नियोजनबध्द असा मोर्चा काढत कातकरी समाज बांधवानी शिस्तीचा आदर्श घडविला.
कातकरी आदिवासींच्या अनेक समस्या आजही जिल्ह्यातील समाज बांधवांना भेडसावत आहेत; मात्र शासन कातकरी आदिवासींच्या प्रश्नांवर गांभिर्याने दखल घेताना आढळून येत नाही. जिल्ह्यात आदिम जमातीचा समाज वास्तव्यास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरी जिल्ह्यातील कातकरी आदिवासी भूमिहिन बेघरच आहे. किती वर्षे हा उघडण्यावरचा संसार सहन करायचा? या जिल्ह्यात कातकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या त्या फक्त वेठबिगारी म्हणूनच कोणाच्या ना कोणाच्या ओसरीवर हा समाज कित्येक वर्षे उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे किती वर्षे आम्ही उघड्यावरच संसार करायचा? असा प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातील कातकरी समाजाचे नेतृत्व करणारे श्री. आईर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पारंपरिक वेशात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

पावसातही मांडले ठाण
आज कातकरी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यावर उपस्थित कातकरी बांधवांना आईर यांनी संबोधित केले. यावेळी कातकरी बांधवांनी आपल्या कला, नृत्य, संगीत सादर करत न्याय मागण्यांसाठी घोषणा दिल्या. यावेळी पाऊस झाला. मात्र, भर पावसात आपल्या न्याय मागण्यांसाठी हा समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसला होता.

स्थलांतरित शेरा
कातकरी समाजाच्या समस्यांच्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात केवळ तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीच पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या पूर्वी आणि आता असलेल्या जिल्हाधिकारी आणि अधिकारी यांनी या समाजाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला असल्याचा आरोप या समाजाचे नेतृत्व करणारे आईर यांनी यावेळी केला. कातकरी बांधव कामासाठी अन्यत्र गेल्यास अधिकाऱ्यांकडून स्थलांतरित झाल्याचा शेरा मारून त्यांना लाभापासून वंचित करतात. शिवाय कुडाळमधील कातकरी समाजाची जागा फायरींग प्रशिक्षणासाठी देऊन प्रशासनाने या समाजावर एक प्रकारे अन्यायच केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
-------------
चौकट
विविध मागण्या
कातकरी समाजाला हक्काची घरे द्या, अंत्योदय योजनेची रेशन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, प्रत्येक कुटुंबाला शौचालय द्या, माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ता, आरोग्याच्या सुविधा आणि शासनाच्या विविध योजना यांचा लाभ विनाशर्त द्या, कातकरी समाजाचा सर्व्हे करा, कातकरी निराधार, अपंग, विधवा यांची नोंद करून निराधार योजनेचा लाभ द्यावा, भूमिहीन कातकरी आदिवासींना हक्काची जमीन द्या यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्या व समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री. आईर, संग्राम पवार, नितीन पवार, नारायण पवार यांच्यासह कातकरी महिला प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या.
-----------
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
जिल्ह्यातील कातकरी समाज बांधवांच्या समस्या आणि मागण्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, त्यासाठी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन आपले प्रश्न व मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी समाज शिष्टमंडळाला दिली.