गुटखा साठाप्रकरणी खेराडे, कच्छीसह चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुटखा साठाप्रकरणी खेराडे, कच्छीसह चौघांवर गुन्हा दाखल
गुटखा साठाप्रकरणी खेराडे, कच्छीसह चौघांवर गुन्हा दाखल

गुटखा साठाप्रकरणी खेराडे, कच्छीसह चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

गुटखा साठाप्रकरणी संशयित आरोपी मोकाट
साडेचार लाखाचा गुटखा जप्त; खेराडे, कच्छीसह चौघांवर गुन्हा
चिपळूण, ता. ३०ः अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई आणि रत्नागिरीच्या संयुक्त पथकाने गुरुवारी येथील बाजारपेठेत टाकलेल्या धाडीत दोन व्यापाऱ्यांकडून साडेचार लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांसह चौघांवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे; मात्र गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी अद्याप मोकाट राहिले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिद्धेश सचिन खेराडे तसेच शहानवाज मुश्ताक कच्छी, मुश्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी, समीर आयुब शेखर (सर्व रा. चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बाजारपेठेतील नाथ पै चौक येथील रूमानी चेंबर्स गाळा नं. १३ येथे सिद्धेश खेराडे याने ३ लाख ४६ हजार ४७९ रुपयाचा गुटखा, पानसमाला, सुगंधी तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थांचा बेकायदेशीर साठा केला होता तसेच मुश्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी याने रंगोबा साबळे मार्गावरील नजराणा अपार्टमेंट येथील फ्लॅट नं. १०३ मध्ये १ लाख ३७५ रुपयांचा गुटखा, पानमसाला आदींचा साठा केला होता. हा फ्लॅट समीर अयुब शेख यांच्या मालकीचा असून त्याने तो मुश्ताक कच्छी याला भाड्याने दिला आहे.
या गुटखा साठ्याची गुप्त माहिती मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांसह गुरुवारी सकाळी ११ वा. दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत खेराडे व कच्छी यांच्याकडील गुटखा व अन्य साहित्य जप्त केले आहे. कारवाईदरम्यान मुश्ताक कच्छी हा मुंबईत होता. त्याचा मुलगा शहानवाज कच्छी याने फ्लॅट उघडून दिला. सदरचा गुटखा साठा वडिलांचा असल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली. रात्री उशिरा चिपळूण पोलिस स्थानकात या घटनेची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलिस स्थानकात सिद्धेश खेराडे याच्यासह शहानवाज कच्छी, मुश्ताक कच्छी व समीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. ही कारवाई रत्नागिरी विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी द. ना. बांबळे, वि.ज. पाचपुते, गुप्त वार्ता विभाग कोकण विभागाचे अरविंद खडके, डॉ. राम मुंडे यांनी केली.

चौकट
धाबे दणाणले
भर बाजारपेठेत घडलेल्या प्रकारामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अशा प्रकारची धडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे अन्न सुरक्षा अधिकारी द. ना. बांबळे यांनी दिली.