‘स्वच्छता लीग’मध्ये मालवण झळकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वच्छता लीग’मध्ये मालवण झळकले
‘स्वच्छता लीग’मध्ये मालवण झळकले

‘स्वच्छता लीग’मध्ये मालवण झळकले

sakal_logo
By

53714
मालवण ः केंद्राच्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण पालिकेला विशेष पुरस्कार देऊन गौरविताना केंद्रीय मंत्री कौशल किशोर.


‘स्वच्छता लीग’मध्ये मालवण झळकले

देशपातळीवरील पुरस्कार; दिल्ली येथे गौरव

मालवण, ता. ३० ः केंद्राने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण पालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर व विभागाच्या सचिव रूपा मिश्रा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयातर्फे दिल्ली येथील तालकटोरा इंडियन स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग देशातील एकूण ४३०० शहरांमध्ये राबविण्यात आली. या स्पर्धेची सुरुवात कचरामुक्त समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांसाठी तरुणांची रॅली या कार्यक्रमाच्या शुभारंभाने १७ सप्टेंबरला झाली होती. या स्पर्धेचा मूळ उद्देश कचरा मुक्त शहर ही संकल्पना व्यापकतेने राबविणे, देशातील पर्यटन शहरांना अधिक सुंदर व स्वच्छ बनविणे आणि एकंदरीत शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे हा होता. या स्पर्धे अंतर्गत मालवण पालिकेकडून कचरामुक्त समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांसाठी तरुणांची रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सामूहिक स्वच्छता शपथ घेऊन एकाच दिवसात शहरातील एकूण ८.५ किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला होता. शहरातील शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस, विविध सेवाभावी संस्था, पत्रकार, नागरिक शहरातील सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत मालवण पालिकेने शहराचा संघ मालवण वॉरियर्स या नावाने नोंद केला होता. पालिकेने मालवण एक पर्यटन शहर असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेली जनजागृती या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्था, नागरिकांचा सहभाग या कार्यक्रमामुळे शहर स्वच्छतेवर होणारा सकारात्मक परिणाम शहरातील नागरिकांची स्वच्छतेविषयीची जागरूकता या कार्यक्रमास मिळालेली प्रसिद्धी. महत्त्वाचे म्हणजे पालिकेकडून केंद्र शासनाला डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून केलेले सादरीकरण या सर्वांचे परीक्षण करण्यात आले होते. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक समीर उन्हाळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियानची संपूर्ण टीम, कोकण विभाग आयुक्त, उपायुक्त, नगरपालिकेतील माजी नगरसेवक, व्यापारी, मच्छीमार, विविध सामाजिक संस्था यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन शहरवासीयांचा सहभाग पालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे मालवण शहर या बक्षिसास पात्र ठरले असे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून झालेल्या या सन्मानामुळे जबाबदारी अजून वाढली आहे. यावर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सुद्धा मालवणवासीयांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. या प्रयत्नात कचरा मुक्त शहर करण्यासाठी कचऱ्याविरुद्ध लढण्यासाठी मालवण शहराला एक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर नावारूपास येण्यास मालवणवासीयांनी सज्ज राहावे, असे आवाहनही श्री. जिरगे यांनी यावेळी केले.
--------
कोट
मालवण हे ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे व प्रसिद्ध शहर आहे. मालवण पालिकेचा केंद्र शासनाकडून झालेला हा सन्मान मालवण, तारकर्ली, देवबाग यासह संपूर्ण जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेणारा ठरेल. मालवण शहराचा हा सन्मान मालवणवासीयांच्या स्वच्छता विषयक सजगतेमुळे शक्य झाला.
- संतोष जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, मालवण