लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला
लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला

लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला

sakal_logo
By

लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला

चिखलीतील घटना, दुचाकीवरुन आणत होते गुहागरला

गुहागर, ता. ३० : लघुशंकेसाठी थांबलेला संशयित गुहागर पोलिसांच्या तावडीतून सुटून जंगलात पळाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तीन महिन्यांत विविध गुन्ह्यांचा वेगाने तपास लावणाऱ्या गुहागर पोलिसांवर या घटनेने नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
एका गंभीर गुन्ह्यात निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी याला पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी त्याला चिपळूण कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. तेथील प्रक्रिया संपल्यावर गुहागरमधील एक पोलिस त्याला दुचाकीवरुन पुन्हा गुहागर पोलिस ठाण्यात घेऊन येत होते. दुचाकी चिखली परिसरात आल्यावर संशयिताने पोलिस कॉन्स्टेबलला लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितले. नैसर्गिक क्रियेसाठी पोलिसाने दयाबुद्धीने दुचाकी थांबवली. लघुशंकेचे नाटक करुन शिवराम साळवी दुचाकीपासून थोडा दूर गेला आणि एकमेव पोलिस असल्याची संधी साधली. या पोलिसाची नजर चुकवून त्याने चिखली परिसरातील दाट जंगलात धुम ठोकली. संशयित साळवी हा निगुंडळचा असल्याने चिखलीचा परिसर त्याच्यासाठी रोजच्या नजरेखालचा आहे. त्यामुळे दाट जंगलातील अनेक पायवाटा त्याला माहिती आहेत. त्याचाच फायदा त्याने घेतला. या घटनेमुळे गुहागर पोलिस ठाणे मात्र चांगलेच हादरुन गेले. मुळात दुचाकीवरुन आरोपीची ने आण करण्यावरच प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या तीन महिन्यांत गुहागर पोलिसांनी अनेक गुन्ह्यांचा शोध वेगाने लावला आहे. त्यामुळे गुहागर पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. त्याचवेळी ही घटना घडल्याने गुहागर पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिस चिंतेत आहेत. संशयिताला कमीत कमी कालावधीत पकडण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. वेगवेगळ्या टीम चिखली ग्रामस्थांच्या मदतीने जंगल परिसराची कसुन तपासणी करत आहेत. गुहागर चिपळूण रस्त्यावर नाका बंदी करण्यात आली आहे.