पान एक-संसदीय लोकशाही चिरकाल टिकावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-संसदीय लोकशाही चिरकाल टिकावी
पान एक-संसदीय लोकशाही चिरकाल टिकावी

पान एक-संसदीय लोकशाही चिरकाल टिकावी

sakal_logo
By

टीपः swt१२७.jpg मध्ये फोटो आहे.

फोटो: ५३९१३

वेंगुर्ले ः बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. सोबत इतर मान्यवर.

संसदीय लोकशाही चिरकाल टिकावी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन; वेंगुर्लेत बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्मशताब्दी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ ः देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. यात जर बदल झाला तर जगातील काही देशांत हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे संसदीय लोकशाहीबाबत तडजोड करता कामा नये, ही भूमिका बॅ. नाथ पै यांनी त्यावेळी प्रभावीपणे मांडली होती. आजही या देशात संसदीय लोकशाही चिरकाल टिकेल, याची खबरदारी घेतली पाहिजे. देशात जो भाग विकासापासून दूर असेल, तेथील विकासाचे प्रश्‍न राजकारण दूर ठेवून एका विचाराने सोडवणे व जगात एक समृद्ध लोकशाहीमध्ये विकसित असा देश करण्यासाठी हातभार लावणे, ही खरी नाथ पै यांना श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे केले.
कोकणचे सुपुत्र बॅ. नाथ पै यांच्या स्मृती जागवण्यासाठी बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग कुडाळ, व्हिक्टर डान्ट्स लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या वतीने बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा पालिकेच्या मधुसुदन कालेलकर बहुद्देशीय सभागृहात झाला. यावेळी श्री. पवार बोलत होते.
ते म्हणाले, ‘देशाच्या संसदेत त्याकाळच्या पंतप्रधानांना नाथ पै यांचा विशेष आदर होता. देशहितासाठीच्या धोरणांमध्ये असलेली कमतरता प्रभावीपणे मांडण्यात नाथ पै यांनी कधी कंजूषपणा दाखवला नाही. एके दिवशी जवाहरलाल नेहरू सभागृहातून बाहेर जायला निघाले आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी पुढचा वक्ता म्हणून बॅ. नाथ पै यांचे नाव जाहीर केले. हे ऐकताच बाहेर गेलेले नेहरू परत येऊन सभागृहात बसले. यावरून त्यांचा संसदेतील अभ्यास अधोरेखित होतो.’
ते म्हणाले, ‘नाथ पै यांचा कोकणावर जास्त जीव होता. म्हणून हा सोहळा करायचा असेल तर तो वेंगुर्लेत करा, अशी सूचना मी केली. आज या ठिकाणी अदिती पै आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे स्मरण करण्याची भूमिका घेतली, याबाबत अतिशय आनंद आहे. मी गेली २५ वर्षे संसदेत आहे. याठिकाणी मी जुनी काही भाषणे काढून वाचतो. त्यात जास्त वाचावीशी वाटतात ती नाथ पै यांची भाषणे. यात त्यांनी त्यांचे विचार अत्यंत प्रभावी मांडले होते. ते बोलायला उभे राहिले की सभागृहात शांतता असायची. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशा अनेकांनी त्यावेळी संसदेचे नेतृत्व केले. या सर्वांना नाथ पै यांचा अत्यंत आदर होता. या सगळ्यांचे नाथ पै हे तीव्र टीकाकार होते; पण त्यात व्यक्तिगत काही नसून त्यांची देशहितासाठी धडपड असायची. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्‍न त्यांनी अत्यंत प्रभावीपणे संसदेत मांडला. कोकणावर त्यांचे खास प्रेम होते. त्यांनी स्थापन केलेल्या कोकण विकास परिषदेचे पाहिले अध्यक्ष नाथ पै झाले. यात कोकणच्या विकासासंबंधी पक्षविरहित विचाराने एकत्र आले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. कोकण रेल्वे संबंधित धोरणात्मक निर्णय त्याच्याच आग्रही भूमिकेमुळे घेतला. देशाच्या हिताची जपणूक करणारा, संसदेबद्दल सन्मान राखणारा लोकशाहीचा पुरस्कर्ता असा एक अलौकिक भारतमातेचा पुत्र आज आपल्यात नसला तरी त्यांचे विचार, कर्तृत्व, आदर्श, इतिहास कधीही जाऊ शकत नाही.’
दीपप्रज्वलन व बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविली. सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘असाही एक बॅरिस्टर’ हे नाट्य सादर केले. व्यासपीठावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, स्वातंत्रसैनिक व बॅ. नाथ पै यांचे साथीदार विठ्ठल याळगी, पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी मंत्री प्रवीण भोसले, चित्रकार अरुण दाभोलकर आदी उपस्थित होते. बॅ नाथ पै यांचे पुतणे शैलेंद्र पै यांनी पवार यांचे स्वागत, तर बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटचे अद्वैत पै, उमेश गाळणकर, सचिन वालावलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. हा जन्मशताब्दी सोहळा बॅ. नाथ पै यांच्या जन्मगावी म्हणजेच वेंगुर्लेत व्हावा, अशी इच्छा शरद पवार यांनीच व्यक्त केल्याचे बॅ. नाथ पै यांच्या नात अदिती पै यांनी प्रस्तावनेत सांगितले.

आदर्शाला गालबोट लागू देणार नाही
संसदेत बसताना मी होय, मी बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्या मतदारसंघातील खासदार आहे, हे अभिमानाने सांगतो. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाला कुठेही गालबोट लागणार नाही, यासाठी मी प्रयत्न करतो, असे खासदार राऊत यांनी सांगितले.


नाथ पैंची आठवण सर्वांच्या मनात
शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, ‘बॅ. नाथ पै समाजवादी विचारांचे प्रतीक होते. समाजासाठी झटणाऱ्या सर्वांसाठी ते एक आदर्श आहेत. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांची आठवण सर्वांच्या मनात चिरंतर राहील. कोकणचा सर्वांगीण विकास हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.’