गोव्याचा खनिज पास ऑनलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्याचा खनिज पास ऑनलाईन
गोव्याचा खनिज पास ऑनलाईन

गोव्याचा खनिज पास ऑनलाईन

sakal_logo
By

53906
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना बाबा परब, नितीन शिरसाट, महेंद्र सांगेलकर, अभी गावडे, समीर दळवी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

गोव्याचा खनिज पास ऑनलाईन

बाबा परब ः माजी खासदार नीलेश राणेंच्या प्रयत्नाने अखेर प्रश्न मार्गी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात होणाऱ्या वाळू, चिरे, खडी वाहतुकीचा प्रवेश पास ऑफलाईन पद्धतीने सुरू असल्याने व्यावसायिकांचा तासनतास खोळंबा होत होता; मात्र गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न आता मार्गी लागला. यामुळे आता यापुढे ऑनलाईन पध्दतीनेच पास देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाळू संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गौण खनिज वाहतुकीअंतर्गत चिरा, खडी, वाळू यांची वाहतुक होते. वाळू टेंडर झाल्यानंतर गोव्यामध्ये चिरे, खडी, वाळू यांची दर दिवसाला सुमारे दीडशे डंपर वाहतूक होते. या वाहतुकीसाठी गोवा सरकारने ५०० रुपये पास काढून गोव्यात प्रवेश करावा, असा नियम केला आहे. या नियमांचे आपण व्यावसायिक स्वागतच करीत आहोत, मात्र हा पास ऑफलाईन पध्दतीने दिला जात असल्याने यासाठी तपासी नाक्यावर सुमारे दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत होती. हा विषय माजी खासदार राणे यांच्या कानावर जिल्ह्यातील चिरा, खडी, वाळू व्यवसायिकांनी घातला होता. ऑनलाईन पध्दतीनेच पास पध्दत सुरू करावी, अशी मागणी केली होती. यावर राणे यांनी याबाबत आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय देतो, असे आश्वासन दिले होते.
येथील एमआयडीसी विश्राम गृह येथे झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी जिल्ह्यातील वाळू, चिरे, खडी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये कुडाळचे नितीन शिरसाट, अभी गावडे, समीर दळवी, सचिन दळवी, सावंतवाडीचे महेंद्र सांगेलकर, मालवण येथील हरेश गावकर, साईराज अणावकर, भाई सडवेलकर, मंदार बांदेकर, सिध्दांत सडवेलकर, प्रशांत मसुरकर, ईशाद शेख, भरत ठाकूर, इलियाज शहा, प्रथमेश तेरसे, निहाज शहा, अभय वालावलकर, स्वप्नील कुलकर्णी, साईराज अणावकर आदींसह इतर गौण खनिज व्यावसायिक उपस्थित होते.
--
चौकट
आता त्रास थांबला
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी राणेंनी चर्चा करून हा पास परत ऑनलाईन पद्धतीनेच सुरू केला आहे. यामुळे आता यापूर्वी जिल्ह्यातील चिरे, खडी, वाळू व्यावसायिकांना जो त्रास होत होता, तो आता थांबला आहे. हा विषय मुख्यमंत्री सावंत व माजी खासदार राणे यांच्या प्रयत्नातून झाला, अशी माहिती परब यांनी यावेळी दिली. तसेच यापुढे प्रलंबित राहत असलेला वाळू टेंडरचा विषय वेळेत मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.