गावचा विकास आराखडा तपासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावचा विकास आराखडा तपासा
गावचा विकास आराखडा तपासा

गावचा विकास आराखडा तपासा

sakal_logo
By

54229
सिंधुदुर्गनगरी : प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस. शेजारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे आदी.

गावचा विकास आराखडा तपासा

संजय कापडणीस ः सिंधुदुर्गनगरीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः कोणत्याही घटकाचा किंवा गावाचा विकास करायचा असल्यास त्याचे उत्तम नियोजन पाहिजे. त्याप्रमाणे गावाचा विकास करताना त्या गावाच्या गरजा लक्षात घेऊन आराखडा तयार केला पाहिजे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गावांनी ‘आपला गाव, आपला विकास’ अंतर्गत तयार केलेले आराखडे नियमाचे पालन करून केलेत का? याची तालुका तांत्रिक समितीने शहानिशा करावी. गावाचा हा विकास आराखडा गरजा लक्षात घेऊन झाला तरच त्या गावचा विकास साधला जाईल, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी प्रशिक्षण कार्यक्रम उद्‍घाटन प्रसंगी केले.
जिल्हा परिषद ग्राम पंचायत विभागातर्फे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा २०२२-२३ साठी तालुका स्तरावर तांत्रिक समिती म्हणून काम पाहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे ३ व ४ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा प्रारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, आयोजक तथा ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, वेंगुर्ले गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, देवगड व कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते. कापडणीस म्हणाले, ‘‘आजच्या प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश विकास आराखडा हे आहे. प्रत्येक गावात विकास आराखडा बनविताना तो आदर्श कसा होईल, याची काळजी घ्यायची आहे. या आराखड्यात नागरिकांनी सुचविलेली कामे नियमात धरून समाविष्ट केली पाहिजेत. गावच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून या आराखड्यात कामांचा समावेश झाला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात किमान एक आदर्श आराखडा तयार झाला पाहिजे. तरच शासनाचा उद्देश सफल होण्यास मदत मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा उत्साही जिल्हा आहे. येथे काम करण्यास संधी आहे. याचा लाभ घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आदर्श आराखडा तयार करावा.’’ या दोन दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून पंढरीनाथ माणगावकर, हर्षदा वाळके मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्यसेविका, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. प्रशिक्षण आयोजनासाठी विस्तार अधिकारी एम. वाय. शिंगाडे, पी. आर. फाले, नितीन नानचे, ग्रामसेवक सुधीर बालम, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कक्षाच्या सारिका पावसकर, लेखाधिकारी सरोजिनी गुराम आदी उपस्थित होते.
.............
चौकट
शासनाच्या ‘थीम’वर आराखडा असावा
विकास आराखडे तयार करताना शासनाने दिलेल्या संकल्पनेला अनुसरून समावेश करावा. तरच विकास आराखडे विकास करणारे व शासनाला अपेक्षित ठरतील, असे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांनी सांगितले. तर प्रास्ताविकात तनपुरे यांनी, प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या पंचायत समिती मतदारसंघातील एका गावाची निवड करून त्या गावचा आदर्श आराखडा तयार करावा. या आराखड्यात शासनाच्या व शासनाला अपेक्षित असलेल्या सर्व थीमचा समावेश असणे गरजेचे आहे. आपण निवड करून तयार केलेला आराखडा जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन केले.