सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण
सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण

सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण

sakal_logo
By

54227
सावंतवाडी ः बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीवर वाढलेली झाडी.
--
54239
सावंतवाडी ः पाच वर्षांत पूर्ण झालेले वर्कशॉप.


सावंतवाडी बसस्थानकाला ‘जीएसटी’चे ग्रहण

ठेकेदार तोट्यात; पाच वर्षांत केवळ वर्कशॉपचे काम पूर्ण

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत बसस्थानकाच्या कामाला जीएसटीचे ग्रहण लागले आहे. हे काम जीएसटीच्या वाढीव रकमेअभावी रखडले आहे. जीएसटी रकमेअभावी संबंधित ठेकेदाराला या कामात निव्वळ तोटा असल्याने पाच वर्षांत केवळ वर्कशॉपचे काम होऊ शकले. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी एसटी महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण कोकणातील अद्ययावत एसटी बसस्थानक उभारण्याचा मुहूर्त तत्कालीन पालकमंत्री तथा सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला होता. केसरकरांनी खासदार विनायक राऊत यांच्या सोबत या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला सूचना करताना दोन वर्षांत हे काम मार्गी लावा, असेही केसरकरांनी म्हटले होते; मात्र याला पाच वर्षे उलटूनही बसस्थानकाचे काम मार्गी लागताना दिसत नाही. सद्यस्थितीत संबंधित ठेकेदाराने वर्कशॉपचे काम पूर्णत्वास नेले आहे. उर्वरित काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. कारण जीएसटी या कामाच्या आड येत आहे. संबंधित काम हाती घेतले तेव्हा भारत सरकारकडून जीएसटीचा निर्णय झाला नव्हता; मात्र नंतरच्या काळात जीएसटी लागू झाल्याने बांधकाम साहित्य दरात वाढ झाली. परिणामी संबंधित ठेकेदार या कामात तोट्यात आला. कारण पूर्वीची रक्कम आणि त्यानंतरची वाढीव रक्कम यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली. एकूणच ठेकेदाराने आपल्याला संबंधित कामाच्या टेंडरमध्ये जीएसटीची रक्कम सामावून द्यावी, अशी मागणी एसटी प्रशासनाकडे केली; मात्र गेली पाच वर्षे ही मागणी पूर्ण होत नसल्याने बसस्थानकाचे काम रखडले आहे.
---
अभियंते म्हणताात...
यासंदर्भात सिंधुदुर्ग एसटी महामंडळाचे बांधकाम अभियंता अक्षय केंकरे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, या कामाचे ६ कोटी ३९ लाखाचे एकूण टेंडर केले होते. या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. यामध्ये वर्कशॉप, बसस्थानक, वेटिंग हॉल, पार्सल ऑफिस, कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, दुकान गाळे, अद्ययावत शौचालय, प्लॅटफॉर्म आदी अनेक गोष्टी समाविष्ट होत्या; मात्र संबंधित ठेकेदाराला जीएसटीच्या निर्णयाने या कामामध्ये तोटा जाणवू लागल्याने त्याने दुर्लक्ष केले.
--
नोटिसा बजावल्या तरीही...
ठरलेल्या नियमानुसार संबंधित ठेकेदाराला वारंवार नोटिसा बजावल्या. हा विषय एसटीच्या संचालक बोर्डापर्यंत नेला; परंतु त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल होऊन सरकार कोसळल्याने हा विषय पुन्हा लांबणीवर पडला. सद्यस्थितीत एसटी महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबईकडे हा विषय पेंडिंग आहे. जोपर्यंत जीएसटीसंदर्भात तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे काम सुरू होणे कठीण आहे, असे केंकरे यांनी सांगितले.
..........
मंत्री केसरकरांच्या भूमिकेकडे लक्ष
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या महत्त्वाच्या कामांपैकी सावंतवाडी बस स्थानक असून त्यांनी आपल्या प्रयत्नातून हे काम मंजूर केले होते. त्यामुळे अद्ययावत बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाचा उपयोग करून त्यांनी जीएसटीच्या रकमेबाबत तोडगा काढणे गरजेचे आहे. यामध्ये निर्णय झाल्यास हे काम निश्चितच मार्गी लागेल, अशी आशा एस.टी.च्या अधिकाऱ्यांना आहे.
.............
कोट
मंत्री केसरकरांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील नवीन बसस्थानकाचे काम अपूर्ण आहे. जीएसटीचा विषय म्हटला तर कुडाळ बसस्थानकाचे कामही त्याच कालावधीत सुरू झाले होते; मात्र तेथील कार्यक्षम आमदार वैभव नाईकांमुळे हे काम मार्गी लागले. केसरकरांना आपल्या घरासमोरील बसस्थानकाचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांनी आजपर्यंत मल्टिस्पेशालिटी, चष्मा कारखाना, कबुलायतदार गावकर प्रश्न अशा अनेक घोषणा केल्या; परंतु त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
- रुपेश राऊळ, तालुका प्रमुख, शिवसेना
---
कोट
येथील बसस्थानकाचे रखडलेले काम संबंधित ठेकेदाराने मार्गी लावणे गरजेचे आहे; मात्र हे करताना शासनाने वाढीव जीएसटी रक्कम ठेकेदाराला द्यावी. शासनाने जीएसटी संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा. जेणेकरून काम मार्गी लागेल; अन्यथा जीर्ण इमारत लक्षात घेता भविष्यात दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शहराचे नागरिक या नात्याने आवाज उठवण्याची तयारी आहे.
- सुरेश भोगटे, माजी नगरसेवक, सावंतवाडी
................
कोट
जीएसटी रकमेमुळे रखडलेले सावंतवाडी बसस्थानकाचे काम मार्गी लावण्यासाठी मंत्री केसरकर प्रयत्नशील आहेत. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यामध्ये निश्चितच तोडगा काढतील. बसस्थानक हे केसरकरांच्या महत्त्वाच्या विकासकामांपैकी एक आहे. त्यामुळे ते निश्चितच मार्गी लावतील.
- अशोक दळवी, माजी सभापती (शिंदे गट)