क्षमेची परमावधी - घुश्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षमेची परमावधी - घुश्मा
क्षमेची परमावधी - घुश्मा

क्षमेची परमावधी - घुश्मा

sakal_logo
By

संघर्षात तेजाळल्या तेजस्विनी---लोगो

इंट्रो

महान होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. प्रयत्न करावे लागतात. चिकाटी, त्याग, धैर्य असे गुण अंगी असावे लागतात. फार मोठी तपश्चर्या लागते. हे दरवेळी घडेलच असं नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, त्याची आव्हानं वेगळी, त्यांचे मापदंड वेगवेगळे. साधं, सुरक्षित आणि सुरळीत आयुष्य अचानक एका क्षणी असं काही वळण घेतं आणि त्यावर एखाद्याची प्रतिक्रिया त्याला महान बनवून जाते. कदाचित इतिहासात नावही कोरून जाते. अशीच आपल्या छोट्याशा कृतीने जनमानसात कायमस्वरूपी स्थान मिळवलेली घुश्मा....
- विशाखा हेमचंद्र चितळे, चिपळूण

-----------------------------
क्षमेची परमावधी - घुश्मा

देवगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या खेड्यातली ही कथा. सुधर्मा आणि सुदेश हे नावाला साजेसं वागणारं दाम्पत्य. सुधर्मा विद्वान होता. त्याचं गुरुकुल होतं. त्याची विद्वत्ता पाहून अनेक विद्यार्थी वेदाध्ययनासाठी दाखल होत असत. सुदेशसुद्धा त्याला साथ देणारी. घरापासून दूर राहणाऱ्या मुलांवर आईप्रमाणे प्रेम करणारी. तरीही एक दुःख होतंच. त्यांना स्वतःला मूल नव्हतं. गावातल्या समारंभात सुदेशला वांझ म्हणून हिणवलं जायचं. ती दुःखी व्हायची. यावर उपाय म्हणून तिने सुधर्माला दुसरं लग्न करायला सांगितलं. सुधर्माने तिला खूप समजावलं. पण ती बधली नाही. सुदेशने विवाहासाठी आपल्याच धाकट्या बहिणीला घुश्माला तयार केलं. सुधर्मा आणि घुश्मा यांचा विवाह पार पडला. सुदेश रोज गावातल्या तलावाकाठी १०१ पार्थिव शिवलिंग करून त्यांची पूजा करी आणि तलावात विसर्जित करी. तिने घुश्मालाही हेच व्रत सांगितलं. मुळात घुश्मासुद्धा सुदेशप्रमाणे सात्विक, देवभोळी होती.
यशावकाश घुश्मेला मुलगा झाला. सारं सुखाने चालू होतं. सुदेशला आधीप्रमाणेच मान मिळत होता. तिला कधीच कुणी डावललं नाही. मुलाचं लग्न होऊन सून आली, तीही सुदेशला छान वागणूक देत होती. तरीही शेवटी सुदेशच्या मनात कली शिरला. ती घुश्मेचा द्वेष करू लागली. ही भावना इतकी पराकोटीला गेली की तिने त्या मुलाला मारून शिवलिंग विसर्जित करत त्याच तलावात टाकून दिले. रात्रीतून गायब झालेल्या मुलाचं काय झालं असेल हे लक्षात येऊनही घुश्मा नेहमीप्रमाणे व्रतासाठी तळ्यावर गेली. व्रत पूर्ण झालं आणि तिने मुलाविना जगण्यापेक्षा तलावात देह झोकून द्यायचे ठरवले. तेवढ्यात आई म्हणून हाक आली. घुश्मेचा मुलगा आणि पाठोपाठ साक्षात भगवान शंकर अवतीर्ण झाले. घुश्मेचा मुलगा तिच्या स्वाधीन केला आणि त्यांच्या भक्ताला त्रास देणाऱ्या सुदेशला मारण्यासाठी निघाले.
आश्चर्याची गोष्ट ही की घुश्मेने त्यांना थांबवले. शंकरांच्या दर्शनाने सारी पापं नष्ट होतात, मग सुदेशचे नाही का होणार? घुश्मेने शंकरांना सुदेशला क्षमा करून अभय देण्याची विनंती केली. तिची भक्ती क्षमायुक्त अंतःकरण पाहून सुदेशला क्षमा केली आणि घुश्मेला एक वर दिला. पुन्हा घुश्मेने स्वतःसाठी काही न मागता विश्व कल्याणासाठी इथेच राहण्याची विनंती केली. शंकर तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. तिथे एक शिवलिंग निर्माण झाले. तेच आजचे घृष्णेश्वर.
साक्षात शंकरांना नरहत्येच्या पातकापासून थांबवल्याने घुश्मा महान ठरली. अपकार करणाऱ्यालाही क्षमा करण्याचे धैर्य तिच्याकडे होतं ते तिच्या अपार भक्तीमुळे. ईश्वरावरील विश्वासामुळे. वांझ स्त्रीला हिणवणं ही चिरंतन भावना आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आजही ही गोष्ट सहज घडत असते. मूल होण्यासाठी दुसरं लग्न करणं, बहिणीलाच सवत म्हणून आणणं हेसुद्धा अजूनही घडत असतंच. त्यानंतर होणारे कलह द्वेष हेही मानवी स्वभावानुसारच. जसं सुदेशनं केलं तसं जीवे मारणं हेही नवीन नाही.
महत्त्वाचं आणि वेगळ हे की, साक्षात ईश्वर तुमच्या मदतीला धावून येईल इतकी तुमची पात्रता हवी आणि ईश्वर भेटल्याच्या आनंदातही सद्सद्विवेकबुद्धी शाबूत हवी की साक्षात परमेश्वरालाही काही सांगता यावं. हा तो जीवनातला क्षण घुश्मेनं जिंकला आणि ती अमर झाली. घुश्मेच्या ठायी वसलेल्या क्षमेला शत शत नमन.

या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥