संक्षिप्त-2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-2
संक्षिप्त-2

संक्षिप्त-2

sakal_logo
By

शिवाजी हायस्कूलचे विविध स्पर्धांत यश
वेंगुर्ले ः तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले. शिक्षणाधिकारी व वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी आयोजित सहावी ते आठवी गटामध्ये सुरुची मराठे हिने ‘पर्यावरण संवर्धन ः काळाची गरज’ या विषयावरील निबंध स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान प्रतिकृतीमध्ये अनुष्क आडके यांची ‘पाण्याचे व्यवस्थापन व संवर्धन’ ही प्रतिकृती तालुकास्तरावर तृतीय आली. त्यांच्या प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. एन.एम.एम.एस. मध्ये पुष्कर पेडणेकर याने शिष्यवृत्ती प्राप्त केली. हर्षदा धर्णे हिला ‘सारथी’ शिष्यवृत्ती मिळाली आहे.

कातकरी वसतिगृहास जीवनाश्यक वस्तू
कुडाळ ः ‘दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग’ संस्थेच्या वतीने संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव खरात यांच्या संकल्पनेतून वेताळ बांबर्डे येथे असलेल्या कातकरी समाजाच्या वसतिगृहातील ६४ मुलांना जीवनाश्यक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. ही संस्था गेली चार वर्षे समाजातील निराधारांसाठी वेगवेगळे उपक्रम लाखो रुपये खर्चून राबवत आहे. ब्रीदवाक्य ‘एक हात मदतीचा’प्रमाणेच संस्था काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध स्तरांतून संस्थेच्या कामाचे कौतुक होत आहे. यावेळी दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

काव्य लेखनात इसफ प्रथम
देवगड ः गेली ३४ वर्षे मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या ‘एकता कल्चर अकादमी’तर्फे घेण्यात आलेल्या गणपत जाधव राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत मूळचे तिथवली येथील आणि सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेले कवी सफरअली इसफ यांनी २०२१-२२ वर्षाचा सर्वोत्कृष्ट कवितेचा प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय पारितोषिक कलमठ येथील कवी किशोर कदम यांनी प्राप्त केल्याची माहिती ‘एकता कल्चर’चे अध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष अजय आंबेकर आणि सचिव प्रकाश पाटील यांनी दिली. स्पर्धेत तृतीय क्रमांक सुधाकर कांबळे, सोनाली अहिरे यांनी, तर उत्तेजनार्थ जगदीश राऊत, शुभांगी थोटम, रवींद्र जाधव, मेगा गोळे, संजय भोईर, शरद गाडगीळ, मायकल लोप्सी यांनी मिळविला. मुंबई येथे होणाऱ्या एकता सांस्कृतिक महोत्सवात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.