यापुढे अव्वलतेसाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यापुढे अव्वलतेसाठी प्रयत्न
यापुढे अव्वलतेसाठी प्रयत्न

यापुढे अव्वलतेसाठी प्रयत्न

sakal_logo
By

54463
कुडाळ ः येथे पंचायत समितीच्यावतीने प्रजित नायर यांचे अभिनंदन करताना परशुराम गंगावणे. (छायाचित्र ः अजय सावंत)


यापुढे अव्वलतेसाठी प्रयत्न

सीईओ प्रजित नायर; स्वच्छ सर्वेक्षणातील यशाबद्दल कुडाळात भव्य रॅली

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता अभियानात पश्चिम भारतात यापुढे प्रथम येण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रयत्न करू. आज आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे जे दैदिप्यमान यश मिळाले, त्यामध्ये सर्व सिंधुदुर्गवासीयांचे योगदान आहे. त्यामुळे मिळालेल्या पुरस्काराचे तुम्ही सर्व मानकरी आहात, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.
लेझीम ढोल व दांडिया नृत्याविष्कारात कुडाळ पंचायत समितीने रॅलीचे भव्य स्वागत केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंर्तगत जिल्हा परिषद सिंधुदुर्गला पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या दैदिप्यमान यशाचा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी स्वीकारला. काल (ता.३) सायंकाळी त्यांचे जिल्हा हद्दीत बांदा येथे आगमन झाल्यानंतर जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे कुडाळ तालुका हद्दीत झाराप येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही रॅली कुडाळ पंचायत समितीच्या प्रांगणात दाखल झाली. या ठिकाणी लेझीम ढोल व दांडिया नृत्याविष्कारात रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, सरपंच संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
श्री. नायर म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंर्तगत पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालय नवी दिल्लीच्या सूचनेनुसार २०२१-२२ या वर्षात राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरू केले होते. देशातील १७हजार ४५० गावांची केंद्रस्तरावरून नेमलेल्या संस्थेमार्फत तपासणी केली होती. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत सर्व निकषांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला तर पश्चिम भारतात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. जिल्हावासियांनी ठिकठिकाणी मला बुके देऊन जल्लोषी स्वागत केले खरे मात्र या सर्व स्वागत अभिनंदनाचे मानकरी संपूर्ण जिल्हा आहे. कुडाळ पंचायत समितीने लक्षवेधी असे स्वागत केले. भविष्यात देशात प्रथम येण्यासाठी तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करू. आपला निसर्गाने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा सर्व क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या सर्व यशाचे मानकरी माझे जिल्हावासीय आहेत.’’ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे, पंचायत समिती कुडाळ प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गीता पाटकर पै, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर तसेच झाराप येथे रॅली स्वागत प्रसंगी झाराप सरपंच स्वाती तेंडुलकर यांच्यासह हुमरस सरपंच अनुप नाईक तेरसेबाबर्डे ग्रामपंचायत सदस्य रूपेश कानडे, ग्रामविस्तार अधिकारी संजय आरोसकर, श्री. खरात, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, ग्रामसेवक उमेश खोबरेकर, ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी सरपंच संघटनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडाळ पंचायत समितीच्या प्रांगणात साकारलेल्या रंगमंचावरील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या पोषण आहार स्पर्धेतील विजेत्यांना तसेच इतर विविध स्पर्धेतील विजेत्यांना नायर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रफुल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
--------
चौकट
सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा
परशुराम गंगावणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. शासनाच्या सर्व उपक्रमात जिल्ह्याचा सहभाग असतो. कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून हा भव्य स्वागत रॅलीचा सोहळा निश्चितच नेत्रदीपक असाच म्हणावा लागेल. स्वच्छता पुरस्काराने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.’’