वेंगुर्लेतील सहा पूल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेतील सहा पूल धोकादायक
वेंगुर्लेतील सहा पूल धोकादायक

वेंगुर्लेतील सहा पूल धोकादायक

sakal_logo
By

54493
मातोंड ः येथील पुलावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे.

वेंगुर्लेतील सहा पूल धोकादायक

वाहतूक अडचणीत; कमी उंचीमुळे पावसाळ्यात डोकेदुखी

दीपेश परब ः सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः तालुक्यातील काही मुख्य मार्गांवरील नदी व ओहोळांवरील प्रमुख सहा पुलांची दुरवस्था झाली असून ती धोकादायक बनली आहेत. शिवाय मुख्य सागरी मार्ग व वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील काही पूलही सखल भागात असल्याने पावसाळ्यात त्यावर सतत पाणी येऊन वाहतूक ठप्प होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकामने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिक व वाहनचालकांना होणारा त्रास थांबवावा व यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात काही अशी पूल आहेत की जी वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. पुलांवर खड्डे पडणे, अवजड वाहतूक होताना पुलांना हादरे बसणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने या पुलावरून वाहने हाकणे धोकादायक बनले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले तालुक्यातील वजराठ देवसु, मठ स्वयंभू मंदिर नजीकचे पूल, मातोंड -होडावडा पूल, आसोली येथील पूल, केळुस दाडोबा येथील पूल अशी पुले ही कमकुवत झाली आहेत. शहरातील हॉस्पिटल नाक्या शेजारी असलेल्या पत्रा पूल हाही धोकादायक बनला आहे. या पुलावरून अवजड वाहने जाताना हादरे बसतात. त्यामुळे या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहेत.
मातोंड व होडावडा या दोन गावांना गोडणाऱ्या नदीवर असलेल्या पुलाची अतिशय दुरवस्था झाली आहे. पुलाच्या एका टोकाला मोठा खड्डा पडला असून पुलावर ठिकठिकाणी लहान खड्डे पडले आहेत. तसेच पुलावर असलेला लोखंडी कठडाही कमकुवत बनला आहे. या पुलावर रोज शेकडो नागरिक प्रवास करत असतात. हे पूल जिल्हा परिषद बांधकामच्या अखत्यारीत असून यावर तातडीने उपाययोजना न केल्यास पूल कोसळण्याची भीती आहे.
गेली कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या आसोली हायस्कूल समोरील पुल हा दिवसेंदिवस खचत चालला असून दरवर्षी त्याला भगदाड पडत आहेत. स्थानिक ग्रामस्थ दरवर्षी पडलेली भगदाडे काँक्रीटच्या सहाय्याने बुजवून वाहतूक सुरळीत करतात; परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग निधीची तरतूद नसल्याचे कारण देत याकडे चालढकल करत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यंदाही या पुलाला मोठे भगदाड पडल्याने नियमित सुरू असलेली एसटी वाहतूक बंद केली होती. त्यामुळे २०० ते २५० कुटुंबांना त्याचा फटका बसला होता. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद यांनी तात्काळ या पुलांसाठी निधी मंजूर करून याचे काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. या पुलावर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार संबंधित विभाग राहतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

54494
पावसाळ्यात गैरसोय
पावसाळ्यात तालुक्यातील होडावडा, केळुस व दाभोली या मुख्य पुलांवरून सतत पावसाचे पाणी जात असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना फटका बसतो. वेंगुर्ले-सावंतवाडी मुख्य रस्त्यावरील होडावडा पूल हे सखल असल्याने या पुलावरून पावसाळ्यात बऱ्याच वेळा पाणी जाते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागलेली असते किंवा वाहतूक मातोंड मार्गे वळवावी लागते.
--
सखल भागात पूल
केळुस व दाभोली ही दोन्ही पूलही सखल भागात असून बाजूला मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. मुख्य सागरी महामार्गवरील केळुस पुलावरूनही अनेकदा पाणी जाऊन वाहतूक ठप्प होते. दाभोली पुलाशेजारील भाग सखल असल्याने ओहोळतील पाणी बाजूच्या शेतात जाऊन ते रस्त्यावर येते. त्यामुळेही वेंगुर्लेच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प असते.
---------
कोट
वजराठ देवसु रस्त्यावरील एक पूल मंजूर असून प्रस्ताव केला आहे. मठ स्वयंभू मंदिर नजीकचे पूल, कमकुवत पूल, संरक्षक भिंत कामासाठी निधी दिला असून पुलासाठी प्रस्ताव आहे. केळुस दाडोबा येथील पूल मंजूर आहे. मातोंड-होडावडा पूल ब्रिज कम बंधारा अंतर्गत प्रस्तावित असून पाठपुरावा सुरू आहे.
-विनायक चव्हाण, कनिष्ट अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम
------------
कोट
वेंगुर्ले तालुक्यातील सार्वजनिक बांधकामच्या ताब्यातील बहुतांशी पूल हे सुस्थितीत असून काही कमकुवत पूल होती ती नवी केली आहेत. असोली येथील पुलाचा प्रस्ताव करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.
- शशांक भगत, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम