शेनाळे शाळेला सरस्वती विद्यामंदिर हे पूर्वीचे नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेनाळे शाळेला सरस्वती विद्यामंदिर हे पूर्वीचे नाव
शेनाळे शाळेला सरस्वती विद्यामंदिर हे पूर्वीचे नाव

शेनाळे शाळेला सरस्वती विद्यामंदिर हे पूर्वीचे नाव

sakal_logo
By

शेनाळे शाळेला सरस्वती
विद्यामंदिर हे पूर्वीचे नाव
शशिकांत लाड ; पाठपुरावा केल्याने शिक्षण विभागाचे आदेश
मंडणगड, ता. ४ः तालुक्यातील शेनाळे येथील शाळेचे बदललेले नाव रद्द करून पूर्वीचे सरस्वती विद्यामंदिर शाळा शेनाळे असे करण्यात यावे, असे पत्र गटशिक्षण अधिकारी मंडणगड यांनी दिल्याची माहिती या संदर्भात पाठपुरावा करणारे शेनाळे येथील ग्रामस्थ व आरटीआय कार्यकर्ते शशिकांत लाड यांनी पत्रकारांना दिली.
या विषयासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेनाळे येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळेचे नाव २०१०-११ ला जिल्हा परिषद मराठी शाळा शेनाळे असे बदलण्यात आले. यापूर्वी ती शाळा सरस्वती विद्यामंदिर शाळा शेनाळे या नावाने ओळखली जात होती. या संदर्भात शशिकांत लाड यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी रत्नागिरी, गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात शाळेचे नाव का बदलण्यात आले, असा अर्ज ५ ऑक्टोबर २०२०ला केला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कार्यवाही करत संबंधित शाळेतील लेखी तपशील व शासकीय दस्तावेज यांची पडताळणी केली. यामध्ये शासनाकडून कोणत्याही पद्धतीने शाळेचे नाव बदलण्यात यावे, असा कोणताही प्रस्ताव अथवा आदेश देण्यात आलेला नसल्याची माहिती उघड झाली. यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला असता या विषयासंदर्भात शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात दिरंगाई होत असल्याने लाड यांनी १ ऑक्टोबर २०२२ ला शाळेसमोर आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे गटविकास अधिकारी मंडणगड यांनी याची गंभीर दखल घेत तक्रारदार लाड यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती समजावून घेत गटशिक्षणाधिकारी मंडणगड यांना या विषयासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे आदेश २६ सप्टेंबरला दिले.
गटशिक्षणाधिकारी मंडणगड यांनी ग्रामविकास व जलसंधारण शासननिर्णय व शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांच्या पत्रानुसार कार्यवाही करत पूर्वीचे सरस्वती विद्यामंदिर हे नाव धारण करण्याचे आदेश दिल्याचे शशिकांत लाड यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी गटशिक्षणाधिकारी मंडणगड यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.