चिपळूण ः गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रतिष्ठानला निधी देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रतिष्ठानला निधी देणार
चिपळूण ः गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रतिष्ठानला निधी देणार

चिपळूण ः गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रतिष्ठानला निधी देणार

sakal_logo
By

गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रतिष्ठानला निधी
आमदार निकम; वक्तृत्व, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
चिपळूण, ता. ४ः आजचे देशामधील विद्वेषाचे वातावरण बदलायचे असेल तर ते गांधीजींच्या विचारानेच व मार्गानेच शक्य आहे. हे काम पूज्य गांधी प्रतिष्ठान सक्षमपणे करत आहे. म्हणून या प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांना निधीची उणीव पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले.
गांधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित गांधी जयंतीच्या कार्यक्रमांत ते बोलत होते. गांधारेश्वर येथील महात्मा गांधींच्या रक्षाकलश समाधीसमोर गांधी जयंतीचा कार्यक्रम प्रतिष्ठानने आयोजित केला होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम व काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी प्रास्ताविकात या स्मारकाला ७५ वर्षे होत असल्याने स्मरणिका प्रकाशनाचा तसेच प्रतिवर्षी दिनदर्शिका काढण्याचा संकल्प जाहीर करत मदत करण्याचे आवाहन केले.
प्रतिष्ठानच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या प्रकाश देशपांडे, प्रकाश काणे व स्मारकाला माहितीफलक देणाऱ्या किशोर पिंपळे यांना ग्रंथभेट देऊन गौरवण्यात आले. परीक्षक शिरीष काटकर, सुनीता महाडिक, प्रा. पांडे, प्रा. बांद्रे, प्रा. वराडे, ऋतुजा खरे यांचाही सन्मान केला. रमेश कदम यांनी गेली ७४ वर्षे येथे होत असलेल्या गांधी जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या आठवणी जागवल्या. प्रतिष्ठानच्या कार्याला नगरपालिका व इतर संस्थांच्या माध्यमातून आपण मदत करू, असे सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेतील तिन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांची गांधीजींच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली. एसपीएमची आद्या विरकर, दलवाई हायस्कूलची मानसी पालांडे, ज्युनिअर कॉलेज सतीची स्नेहा शिंदे या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. एसपीएमची दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मनवा सातारकर या मुलीने इंग्रजीत केलेल्या भाषणाने सर्वांची कौतुकाची दाद मिळवली. प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीचे सदस्य लियाकत शहा यांनी सहकार्य करणाऱ्या संबंधितांविषयी ऋणनिर्देश केला.