खेड-विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडते लॅग्वेज लॅब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडते लॅग्वेज लॅब
खेड-विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडते लॅग्वेज लॅब

खेड-विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडते लॅग्वेज लॅब

sakal_logo
By

भाषा समृद्धीसाठी प्रयोगशाळा---लोगो

व्यक्तीमत्वाला पैलू पाडते लॅग्वेज लॅब

आयसीएस महाविद्यालय ; शंभरहून अधिकजणांना लाभ
खेड, ता. ६ ः मानवी जीवनात भाषा हा अविभाज्य घटक असून, मानवाच्या व्यक्तीमत्वात भाषिक कौशल्य हे महत्वाची भूमिका बजावत असते. खेड येथील आयसीएस महाविद्यालयात भाषेच्या प्रयोगशाळेचा झालेला यशस्वी प्रयोग उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम करत आहे. खेड तालुक्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या दोन शैक्षणिक वर्षामध्ये येथील आयसीएस महाविद्यालयातील लॅंग्वेज लॅबचा वापर करून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत तयार करण्यात आलेला इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना हाताळता येत आहे. विद्यार्थ्यांना भाषेतील संवाद कौशल्य शिकवण्यासोबतच सभाधिटपणा, सार्वजनिकरित्या भाषण कसे करावे, इंग्रजीमध्ये बिनचूक वाक्यरचना कशी करावी, मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांना कसे सामोरे जावे, व्यावसायिक भाषा कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, स्वतःतील दोष व बलस्थाने ओळखून स्वतःचे म्हणणे कशाप्रकारे मांडावे याचादेखील सराव विद्यार्थ्यांना करण्याची संधी या प्रयोगशाळेत उपलब्ध होत आहे. परिणामी भाषिक प्रयोगशाळा ही शेकडो विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास करणारी ठरली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून शैक्षणिक प्रगतीसोबतच चांगल्या सवयी व विधायक विचारसरणी रुजवण्याचे काम लॅंग्वेज लॅबच्या माध्यमातून आयसीएस महाविद्यालयात होताना दिसत आहे. एकावेळी ३० विद्यार्थी या प्रयोगशाळेचा वापर करत असल्याने एकमेकांच्या सहकार्याने सामूहिक संभाषण कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे नवीन आधुनिक व्यावसाय जगतामध्ये नोकरी व व्यवसाय उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होत आहे. इंग्रजी ही वैश्विक भाषा असल्यामुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी लॅबचा आंतरराष्ट्रीय जगतातील उपलब्ध संधींना गवसणी घालता येणार आहे.
---
कोट
आधुनिक युगातील जीवनपद्धती दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना पुढील जीवनात या लॅंग्वेज लॅबचा निश्‍चितच चांगला उपयोग होणार आहे. या लॅंग्वेज लॅबमध्ये आयटी, इव्हेट मॅनेजमेंटसह अन्य विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. लॅंग्वेज लॅबमध्ये विविध देश-विदेशातील भाषेचा मूळ गाभा शिकवण्याचे काम होत असून, अमेरिका, रशिया, युके यासारख्या देशातील भाषेचा परिपक्व अभ्यासक्रम या ठिकाणी घेतला जात आहे.
---मंगेशभाई बुटाला, सचिव , सहजीवन शिक्षण संस्था