रत्नागिरी ः 2 लाख 93 हजार लाभार्थींना जंतनाशक गोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः 2 लाख 93 हजार लाभार्थींना जंतनाशक गोळ्या
रत्नागिरी ः 2 लाख 93 हजार लाभार्थींना जंतनाशक गोळ्या

रत्नागिरी ः 2 लाख 93 हजार लाभार्थींना जंतनाशक गोळ्या

sakal_logo
By

२ लाख ९३ हजार लाभार्थींना जंतनाशक गोळ्या

जिल्हा परिषद आरोग्य विभाग ; पौगंडावस्थेतील मुले-मुली लाभार्थी

रत्नागिरी, ता. ६ ः राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पौगंडावस्थेतील मुलामुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. शाळा, अंगणवाडी, शिक्षणासंस्थांसह समुदाय स्तरावर घरोघरी जाऊन २ लाख ९३ हजार ३५९ लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार, मातीतून प्रसार होणार्‍या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेतील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच १० डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम आणि १७ डिसेंबरला मॉपअप् दिन राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात राबवण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. परिक्षित यादव यांच्या कार्यालयात बैठक झाली. ग्रामीण आणि शहरी लाभार्थींनी मोहिमेत आपल्या १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळीचा लाभ दिला जाणार आहे. या मोहिमेमुळे मुलामुलींचे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होण्यास मदत होते. १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ३७८, शाळा ३१५१ आणि अंगणवाडी २२६१ अशा एकूण ६ हजार ४६७ संस्थात समुदाय स्तरावर घरोघरी जाऊन, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ९३ हजार ३५९ लाभार्थींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाईल.
-------------
चौकट १
लाभार्थी व औषधाची मात्रा

* १ ते २ वर्ष ः अर्धी गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून पाजावी.
* २ ते १० वर्ष ः एक गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून द्यावी.
* ११ ते १९ वर्ष ः एक गोळी चावून खाणे.
--------
चौकट २
जंतनाशक मोहिमेचे फायदे :
* रक्तक्षय कमी होतो
* शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारते.
* बालक क्रियाशील बनते व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.