पान एक-परतीच्या पावसाची पुन्हा झोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-परतीच्या पावसाची पुन्हा झोड
पान एक-परतीच्या पावसाची पुन्हा झोड

पान एक-परतीच्या पावसाची पुन्हा झोड

sakal_logo
By

५४८२३
५४८२४

परतीच्या पावसाची पुन्हा झोड
भात पिकावर संकट; हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ ः विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने आज जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील ६० टक्के भातपिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची संभवना आहे. पावसामुळे काही भागात कापणीला आलेली भातपिके जमिनीवर कोसळू लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. चार-पाच दिवसानंतर काल सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आज दुपारपासूनच जिल्ह्यात विजांच्या गडगडाटांसह परतीचा पाऊस सुरू झाला. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांच्या पूर्वपट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी तालुक्यातील काही गावांना पावसाने चांगलेच झोडपले. सतत पडत असलेल्या पावसामुळे शुकनदी दुथडी भरून वाहत आहे. शांती नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे.
परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यातील ६० टक्क्यांहून अधिक भातशेती कापणीला आलेली आहे. नवरात्रोत्सवातून शेतकऱ्यांनी भातकापणीची पूर्वतयारी केलेली होती. आजपासून अधिकत्तर शेतकरी भातकापणी करणार होते; परंतु आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. हळवी भातपिके पूर्णतः परिपक्व झाल्यामुळे ती आता जमिनीवर कोसळू लागली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास या भातपिकांचे नुकसान होणार असल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचा परिणाम झाला. जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाची सांगता काल विजयादशमी दिवशी झाली. त्यामुळे आज सायंकाळी दुर्गामाता मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती; परंतु पावसाचा या मिरवणुकीवर देखील परिणाम झालेला दिसून आला.


कापणी लवकरच
जिल्ह्यातील ६० टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. ३० टक्के भातपीक येत्या आठ ते दहा दिवसांत परिपक्व होईल, अशा स्थितीत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने उघडीप दिल्यास भातकापणी हंगामाला सुरुवात होणार आहे.

भातपिकपूर्णतः तयार झाले असून आजपासून भातकापणीला सुरूवात करणार होतो. परंतु, आज सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे भातकापणी करता आलेली नाही. पावसाने उघडीप देताच कापणी करणार आहोत.
- संकेत पवार, भात उत्पादक शेतकरी, खांबाळे, वैभववाडी