चिपळूण-तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा वस्तूसंग्रहालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा वस्तूसंग्रहालयात
चिपळूण-तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा वस्तूसंग्रहालयात

चिपळूण-तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा वस्तूसंग्रहालयात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat८p१५.jpg-KOP२२L५५१७८ अश्वारूढ खंडोबा
----------
तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा वस्तूसंग्रहालयात

लोटिस्माला भेट ; विशेष देव्हाऱ्यात ठेवणार मूर्ती
चिपळूण, ता. ८ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या संग्रहालयाला तीन किलो वजन आणि २६ सेंटीमीटर उंची असलेली अश्वारूढ खंडोबाची मूर्ती भेटीदाखल मिळाली आहे.
सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष (कै.) रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. पत्की यांच्या घराण्यात वारस नसल्यामुळे नित्यपूजेतील त्यांनी ही मूर्ती मोहन चितळे यांच्याकडे दिली होती. चितळे यांनी या मूर्तीसह आणखी पूजेतील दोन मुद्रांकित मूर्ती (टाक) वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयास भेट दिले.
ब्रिटिश भारतात चिपळूण नगर पालिकेच्या शासननियुक्त नगराध्यक्ष यांना कार्यकारी अधिकारी म्हणत असत. पहिले अधिकारी म्हणून (कै.) रंगनाथ बापूजी पत्की यांची शासनाने निवड केली होती. पत्की १८७७ पासून १९०७ पर्यंत सलग ३० वर्षे पदावर कार्यरत होते. पत्की हे चिपळूण शहरातील सर्वमान्य व्यक्तिमत्त्व होते. शहरात त्यांची मोठी मालमत्ता होती. शहरात आज उभे असलेले मच्छी मार्केट आणि मटण मार्केटची जागा पत्की यांची होती. नवा भैरी मंदिराची जागाही पत्की यांनीच दिली होती. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची आजची इमारत असलेली जागा (कै.) पत्की नगराध्यक्ष असताना वाचनालयाला कराराने देण्यात आली होती. दीडशे वर्षांपूर्वीचे हे करारपत्र वाचनालयात उपलब्ध आहे. चिपळूणचे पहिले नगराध्यक्षपद भूषवलेल्या पत्की यांचे छायाचित्र मात्र उपलब्ध नाही.
वाचनालयाचे संचालक मधुसुदन केतकर, कार्यवाह विनायक ओक, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, संजय शिंदे यांनी मोहन चितळे यांच्याकडून ही मूर्ती सन्मानपूर्वक वाचनालयात आणली. या वेळी वाचनालयातर्फे मोहन चितळे यांना मधुसुदन केतकर यांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. वस्तुसंग्रहालयात विशेष देव्हारा करून त्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे, असे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी सांगितले.