चिपळूण ः फिस्स, अँटीड्रोन यंत्रणेवर होणार 125 कोटीचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः फिस्स, अँटीड्रोन यंत्रणेवर होणार 125 कोटीचा खर्च
चिपळूण ः फिस्स, अँटीड्रोन यंत्रणेवर होणार 125 कोटीचा खर्च

चिपळूण ः फिस्स, अँटीड्रोन यंत्रणेवर होणार 125 कोटीचा खर्च

sakal_logo
By

कोयना प्रकल्पाची सुरक्षा--लोगो

फिस्स, अँटीड्रोन यंत्रणेवर होणार १२५ कोटींचा खर्च

देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला दहा कोटी ; वीजबीलामार्फत वसूली
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : पोफळीतील कोयना प्रकल्पाची सर्व सुरक्षा व्यवस्था सीआयएसएफच्या ताब्यात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी ''फुल्ली इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टीम'' (एफआयएसएस) राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासोबतच अँटीड्रोन यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला दहा कोटींचा खर्च येणार आहे.
महानिर्मिती कंपनीने ४ वर्षापूर्वी कोराडी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात ''फिस्स'' ची यंत्रणा बसवली आहे. चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात सुद्धा ही यंत्रणा बसवली जात आहे. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे सुमारे ४० कोटी आणि ७० कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पोफळी आणि त्यापाठोपाठ उरण येथील प्रकल्पात ''फिस्स''ची यंत्रणा बसवली जाणार आहे. अलीकडेच चंद्रपूर, पोफळी आणि उरण येथील प्रकल्पाचा ''फिस्स''साठी सर्व्हे करण्यात आला, त्यावेळी त्यावर सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तिन्ही ठिकाणी २-२ दिवसांच्या दौऱ्यावर हा खर्च झाला आहे. कोयना प्रकल्पाच्या परिसरात ''फुल्ली इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टीम'' बसविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. ''फिस्स'' आणि अँटीड्रोन यंत्रणा बसविल्यानंतर पहिल्या ३ वर्षांच्या देखभालीचा खर्च ही यंत्रणा पुरवणी कंपनी करणार आहे. त्यानंतर ''फिस्स''च्या यंत्रणेवर महानिर्मितीला प्रत्येक वर्षी किमान १० कोटींचा देखभाल खर्च करावा लागणार आहे. कोयना प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्था सीआयएसएफकडे सोपवण्यासाठी हालचाल सुरू आहेत. सीआयएसएफच्या सूचनेनुसार सर्व सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता सुरू आहे. मात्र हा खर्च सामान्य नागरिकांच्या खिशातून वीज बीलामार्फत वसूल केला जाणार आहे.
-----------
चौकट
कोणाच्या डोक्याने हा खटाटोप
सीआयएसएफने कोणतीही मागणी केली नसतानाही प्रकल्पात ''फिस्स'' आणि अँटीड्रोन यंत्रणा बसवण्यामागे कुणाच्या डोक्यातील सुपीक कल्पना काम करीत आहे, यावर सध्या महानिर्मितीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. हे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे. मात्र, ''प्रकाशगडा''वर बसलेल्या वरिष्ठांच्या डोक्याने हा सगळा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.
-------------
कोट
कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ, फुल्ली इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टीम आणि अँटीड्रोन यंत्रणेची खरच गरज आहे का या परिक्षण महानिर्मिती कंपनीने करणे गरजेचे आहे. कंपनीकडून अत्यंत कमी खर्चात सुरक्षेचे सर्व निकष पाळून प्रकल्पाची सुरक्षा केली जात होती. अशा परिस्थितीत आताच ही यंत्रणा बसवण्याची गरज का भासली याचा अभ्यास होण्याची गरज आहे. कारण या कामासाठी लागणारा निधी जनतेच्या खिशातून जाणार आहे.
---संतोष घाडगे, केंद्रीय कोषाध्यक्ष, तांत्रिक कामगार युनियन, पोफळी