जिल्ह्यात आजपासून ‘डाक सप्ताह’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आजपासून ‘डाक सप्ताह’
जिल्ह्यात आजपासून ‘डाक सप्ताह’

जिल्ह्यात आजपासून ‘डाक सप्ताह’

sakal_logo
By

जिल्ह्यात आजपासून ‘डाक सप्ताह’

मयुरेश कोले ः विविध योजनांच्या प्रसारासाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः जागतिक टपाल दिनानिमित्त सिंधुदुर्ग टपाल विभाग उद्यापासून (ता. ९) राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करत आहे. यावर्षीच्या डाक सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार केला जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी दिली. डाक खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोबाईल युगाच्या अभूतपूर्व क्रांतीनंतर वैयक्तिक संदेश वहनासाठी टपालाचा वापर कमी होत असताना टपाल विभाग स्वतःमध्ये अमुलाग्र बदल घडवून खात्याचे अस्तित्व व उपयुक्तता टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. टपाल क्षेत्रात संदेशवहन साधनांची आधुनिकता व खासगी कुरियर कंपन्यांचे आगमन झाल्यानंतर टपाल खात्याने सर्व टपाल कार्यालयांचे संगणकीकरण, हवाई टपाल वाहतूक, ''ट्रॅक अँड ट्रेस'' व मेसेज सुविधा आदींचा वापर करून टपाल ग्राहकांना आधुनिक सेवा प्रदान केल्या आहेत. त्यामुळे व्यापारी टपालांचे प्रमाण इतर कुरियर कंपन्यांपेक्षा जास्त प्रमाणात टपाल खात्यामार्फत वितरीत होत आहे. यासाठी स्पीड पोस्ट, बिझनेस पार्सल, कॅश ऑन डिलिव्हरी, ई-पोस्ट इत्यादी सेवा ''बुक नाव पे लेटर'' सुविधेसह उपलब्ध करून देण्याचे काम टपाल खात्याने केले आहे, असे अधीक्षक कोले यांनी म्हटले आहे.
बँकिंग क्षेत्राचा विचार करता टपाल खात्यामधील ''अल्प बचत योजना'' या सर्वात लोकप्रिय, विश्वासू व सर्वाधिक व्याज देणाऱ्या आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक सेवेचा लाभ देताना खात्याने ऑनलाईन व्यवहार, डिजीटल पेमेंट, एटीएम सुविधा, आयपीपीबी अॅपद्वारे इंटरनेट बँकिंग आदी सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना देशातील कोणत्याही पोस्टात व्यवहार करणे अथवा घरबसल्या पैसे गुंतविणे शक्य आहे. विमा क्षेत्रामध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स व ग्रामीण टपाल जीवन विमा यांच्या माध्यमातून सर्वाधिक बोनस व कमी हप्ता, ऑनलाईन हप्ता भरण्याची सोय, पासबुक सुविधा आदी सेवांचा लाभ ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करून टपाल खात्याने केल्याने शहरी व ग्रामीण भागातील विमेदारांचे हित जपण्याचे काम केले आहे.
---
टपाल विभागाची घौडदौड
सिंधुदुर्ग टपाल विभागाने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरपर्यंत टपाल जीवन विम्याच्या ४९२ नवीन पॉलिसी व ग्रामीण टपाल जीवन विम्याच्या १४५९ नवीन पॉलिसी उघडल्या आहेत. जीवन विमा क्षेत्रात ९ सप्टेंबरला केवळ एका दिवसात रुपये २५ लाखाहून अधिक रक्कम जमा करून विभागाने राष्ट्रीय स्तरावर दुसरा, तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. बँकिंग क्षेत्रात विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत २५ हजार ८७१ नवीन खाती उघडली आहेत. सप्टेंबरमध्ये आयोजित विशेष अभियानात संपूर्ण विभागातून ७५६२ इतकी नवीन खाती उघडण्यात आली, असे यावेळी कोले म्हणाले.