बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत 92 लाखाचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत 92 लाखाचा डल्ला
बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत 92 लाखाचा डल्ला

बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत 92 लाखाचा डल्ला

sakal_logo
By

पान १ साठी

दृष्टिक्षेपात
यश कन्स्ट्रक्शन फर्मला फटका
नेट बँकिंगद्वारे पैसे परस्पर काढले
आर्थिक व्यवहाराची सिस्टीम हॅक
४ ऑक्टोबरला डल्ला, ७ ला मेसेज

बँकेची सिस्टीम हॅक करून ९२ लाखांचा डल्ला
लांजा शाखेतील प्रकार; ऑनलाइन फसवणूक; बॅंकेच्या स्टार टोकन ॲपवर प्रश्नचिन्ह
लांजा, ता. ८ ः येथील यश कन्स्ट्रक्शन फर्मच्या बँक ऑफ इंडियाच्या लांजा शाखेतील खात्यामधून ९२ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. हॅकर्सकडून बँकेची स्टार टोकन सिस्टीम ही आर्थिक व्यवहाराची सिस्टीम हॅक करून ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याचा गुन्हा लांजा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्याने बँकेच्या ऑनलाईन सिस्टीमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लांजा शहरातील शासकीय कंत्राटदार व यश कन्स्ट्रक्शनचे मालक सुधीर भिंगार्डे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. लांजात यश कन्स्ट्रक्शन ही शासकीय बांधकाम कामे करणारी मोठी फर्म आहे. या फर्मचे खाते बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत आहे. नेट बँकिंगद्वारे ते व्यवहार करतात. ७ ऑक्टोबरला बँक खात्याला लिंक असलेल्या सुधीर भिंगार्डे यांच्या मोबाईल नंबरवर खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज आला. कोणताही व्यवहार केलेला नसताना हे पैसे का कमी झाले म्हणून बँकेच्या स्टार टोकन सिस्टीमकडून चेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेट बँकिंगसाठी असलेले बँकेचे स्टार अप टोकन ही बँकिंग सेवा त्यादिवशी चालू नव्हती. म्हणून फर्मचे मॅनेजर वसंत मसणे यांनी लांजा शाखेत जाऊन याची खातरजमा केली. त्यांनी बँक खात्याचा तपशील काढला असता त्यातील ९२ लाख ५० हजार रुपये परस्पर काढल्याच्या नोंदी दिसून आल्या.
सुधीर भिंगार्डे यांनी स्वतः बँकेत जाऊन घटनेची खात्री केली. त्यांनी बँक मॅनेजरना आम्ही ही रक्कम काढली नसताना हे पैसे खात्यातून कमी का झाले, याची पडताळणी करण्याची विनंती केली. त्यावर पडताळणी केली असता अज्ञाताने ४ ऑक्टोबरला दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान ही रक्कम परस्पर काढून घेतल्याचे उघड झाले.

नेट बँकिंग सेवेतच फसवणूक
ही रक्कम खात्यातून कमी झाली, त्या कालावधीत यश कन्स्ट्रक्शनकडून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, हे बँकेत पडताळणी केल्यानंतर स्पष्ट झाले. यामुळे अज्ञातांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया यामधील स्टार टोकन ॲप हे व्यवहार करण्यासाठी अतिशय सुरक्षित असे म्हणून वापरले जाते; परंतु याच नेट बँकिंग सेवेतच ही फसवणूक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या बँक खात्याविषयी शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.