उसाच्या दोन जाती कोकणात सरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसाच्या दोन जाती कोकणात सरस
उसाच्या दोन जाती कोकणात सरस

उसाच्या दोन जाती कोकणात सरस

sakal_logo
By

55966
नापणे ः संशोधन केंद्राच्या जागेत उसाच्या विविध जातींची केलेली लागवड.


उसाच्या दोन जाती कोकणात सरस

नापणेतील संशोधन; ‘कोएम ०२६५’, ‘को ९२००५’ यांचा समावेश

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः कोकणातील वातावरणात कोएम ०२६५ आणि को ९२००५ या ऊसाच्या जाती पहिल्या निष्कर्षात सरस ठरल्या आहे. नापणे ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून नापणे येथे ११ एकरमध्ये आठ जातीची संशोधनाच्या हेतूने लागवड करण्यात आली आहे. या दोन्ही जातींमधून हेक्टरी सुमारे ८०.४५ आणि ८०.४६ टन इतके उत्पादन मिळाले आहे.
कोकणातील काही तालुक्यांमध्ये काही वर्षांपासून ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. एकीकडे लागवड क्षेत्र वाढत असले तरी दुसरीकडे उत्पादन क्षमता मात्र वाढताना दिसत नाही. गेल्या दोन तीन वर्षाचा आढावा घेतला असता एकरी १५ ते १६ टन उत्पादनाचे आकडे समोर येत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही, अशी शेतकऱ्यांची खंत होती. त्यामुळे कोकणातील वातावरणात उसाच्या नेमक्या कोणत्या जातीची लागवड करायला हवी, येथील वातावरण कोणत्या जातींना पोषक आहे, याचा अभ्यास होण्याची गरज होती.
नापणे येथील ऊस संशोधन केंद्राला दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. नापणे येथील १७ एकर जागा संशोधन केंद्राच्या ताब्यात आहे. या जागेत २०२० पासून डॉ. विजय शेट्ये यांची टीम ऊसावर काम करीत आहे. २०२० मध्ये संशोधन केंद्राच्या माध्यमातून पहिल्या वर्षी विविध आठ जातीची सात एकरमध्ये लागवड करण्यात आली. सरीमधील अंतर साडेतीन फुट ठेवून ही लागवड केली होती. त्यामुळे या आठ जातींपैकी नेमकी कोणती जात कोकणातील वातावरणास अनुकुल आहे, याबद्दलचे कुतुहल शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते.
----
शेतकऱ्यांसाठी फायद्याची बाब
खरेतर तीन वर्षांच्या निष्कर्षानंतर अंतिम निष्कर्ष काढता येणार असला तरी पहिल्या वर्षाच्या निष्कर्षात ‘कोएम ०२६५’ या जातीपासून हेक्टरी ८०.४६ टन तर ‘को ९२००५’ या जातीपासून हेक्टरी ८०.४५ टन इतके उत्पादन आले आहे. या दोन जातीच्या तुलनेत इतर जातीपासून खूपच कमी उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे पहिल्या निष्कर्षानुसार कोकणातील वातावरण या जातीसाठी पोषक मानले जात आहे. संशोधन केंद्राच्या माध्यमातून पुढील दोन वर्षे यासंदर्भात अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे.
-----------
पाँईटर
जिल्ह्यात १ हजार २०० हेक्टरवर ऊस लागवड
- दोन वर्षाच्या सरासरीनुसार एकरी अवघे १५ ते १६ टन उत्पादन
- ऊस संशोधन केंद्राने एकरी ३० टनाचा टप्पा ओलांडला
- उसाच्या आठ जातीचे निष्कर्ष
- तीन वर्षानंतर अंतिम निष्कर्ष
----
कोट
उसाच्या विविध आठ जातींची लागवड आम्ही २०२० मध्ये ऊस संशोधन केंद्राच्या जागेवर केली होती. पहिल्या वर्षी दोन जातीचे उत्पादन इतर जातीच्या तुलनेत चांगले आहे. अजून दोन वर्ष आम्ही या जातीचे निरीक्षण करणार आहोत. त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला जाईल. याशिवाय अन्य काही बाबींबर देखील आमचे संशोधन सुरू आहे.
- डॉ. विजय शेट्ये, प्रकल्प अधिकारी, ऊस संशोधन केंद्र, नापणे
-----------
कोट
जिल्ह्यातील वातावरणात ऊसाच्या कोणत्या जाती अनुकुल आहेत, याचा अभ्यास होणे गरजेचे होते. संशोधन केंद्राने सुरू केलेले संशोधन हे भविष्यात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत.
- विनोद जठार, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
-----------
चौकट
लागवड केलेल्या जाती
कोएम ०२६५
कोएम ९०५७
को-८६०३२
को-९२००५
को-८०१४
को-७५२७
को-७५२७
एमएस-१०००१
कोसी-६७१