संजय मयुरेंचा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय मयुरेंचा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी
संजय मयुरेंचा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी

संजय मयुरेंचा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी

sakal_logo
By

rat१२p१२.jpg
५५९७१
रत्नागिरी : सायकलवरून भारत भ्रमण करणारे संजय मयुरे यांच्यासमवेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मृत्यूंजय खातू, डॉ. प्रभुदेसाई, विनायक पावसकर, दर्शन जाधव, अमित कवितके, नीलेश शाह, योगेश मोरे, महेश सावंत. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------
संजय मयुरेंचा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी
भारत भ्रमण ; रत्नागिरीत स्वागत, दिवसाला १०० किमीचा प्रवास
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : आजवर सायकलवरून १७ देशांचा प्रवास, विविध स्पर्धांमधील १५० बक्षीसे आणि अनेकदा केलेला भारतभर प्रवास ही थक्क करणारी वाटचाल ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. अथेन्स ऑलिंपिक येथे भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता ते चक्क सायकलवरून तिथे पोहोचले. कुठेही फिरताना प्रामाणिकपणामुळे वाईट अनुभव आले नाहीत. बुलढाण्यात ते सायकलवाला नावाने सुप्रसिद्ध असणारे बुलढाण्यातील ६८ वर्षीय सायकलपट्टू संजय मयुरे यांचा हा थक्क करणारा प्रवास नवोदित सायकलपटूंसाठी प्रेरणादायी आहे. भारत भ्रमणासाठी निघालेले मयुरे रत्नागिरीतून पुढे सिंधुदुर्गला रवाना झाले. त्यावेळी त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळाली.
खामगाव येथील श्री. मयुरे यांनी २ ऑक्टोबरला २० हजार किमीची सायकल राईड मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून सुरू केली. ते दररोज ७५ ते १०० किमी अंतर पार करत आहेत. मुंबई, सागरी महामार्गावरून कोकण, कन्याकुमारी, चेन्नई, कोलकत्तापर्यत त्याची सायकलवारी समुद्र किनाऱ्याने होणार आहे. आसामसह ७ राज्ये, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरातमार्गे परत मुंबईला येणार आहेत. प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश संपूर्ण भारतभर देणार आहेत. ही सायकलवारी देशाच्या शूरवीर जवानांना समर्पित आहे.
श्री. मयुरे म्हणाले, लहानपणी गरिबी असल्याने भाड्याने सायकल घेऊन दररोज शेगावला दुपारच्या प्रसाद घ्यायला जायचो. एकदा सायकल स्पर्धा होती, त्यात भाग घेतला आणि बक्षीस मिळाले आणि सायकलिंग नियमित सुरू केले. सायकल हा माझा जीव की प्राण आहे. पुढे शिक्षणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीसाठी मुलाखती होत्या. मी सायकल घेऊन गेल्यामुळे उशिर झाला त्यामुळे माझा क्रमांक गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार मांडली व रात्री १ वाजता सर्वांत उशिरा माझी मुलाखत झाली. निवड यादीत माझे पहिले नाव लागले होते आणि नोकरी लागली. नोकरीतही प्रामाणिकपणा जपला. नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालो. या काळात बरेच सायकलिंग सुरू राहिले. अनेक वर्षे घोडा सायकल वापरली. अलीकडे मित्रांनीच गिअरची सायकल त्यांना दिली. आतापर्यंत अनेकदा सायकल सफर केली. एकदा चंबळच्या खोऱ्यात डाकूंनी डोळ्यावर पट्टी बांधून पकडून नेल्याची आठवण सांगितली. तेव्हा केस पोलिसांप्रमाणे कापल्याने त्यांना वाटले मी पोलिसच आहे. पण सोबत वृत्तपत्रातील बातम्या दाखवल्या. माहिती दिल्यानंतर त्यांनी पुन्हा रस्त्यावर आणून सोडल्याचे सांगितले. अथेन्स ऑलिंपिकला सायकल घेऊन स्वखर्चाने जात असताना वरिष्ठांकडून परवानगी मिळत नव्हती, त्यावेळी वरिष्ठांना कार्यालयात जाऊन साष्टांग नमस्कार घालून आलो आणि त्यांनी चौकशी करून परवानगी दिल्याची कथाही मयुरे यांनी सांगितली.
सायकल सफरीला परदेशात गेले असता श्री. मयुरे यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले. त्यावेळी त्यांना पायरीवर पडलेले पैसे मिळाले. त्यांनी तिथल्या व्यवस्थापकांना सांगितले व ते पैसे दानपेटीत टाकले. नंतर तिथे एक पंजाबी माणूस भेटला. त्याने आस्थेने चौकशी केली आणि मोबाईल दिला व पुढील प्रत्येक देशात जाताना वाटेत राहण्याची व्यवस्था केली. आज तो मित्र संपर्कात असतो, अशी आठवण मयुरे यांनी सांगितली.
----------
चौकट
आरसीसीची साथ
श्री. मयुरे रत्नागिरीत येणार असल्याचे समजताच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बंदररोड येथे डॉ. प्रभुदेसाई यांच्या संजीवनी हॉस्पीटल येथे क्लबच्या सदस्यांनी वार्तालाप केला. दुसऱ्या दिवशी पावसपर्यंत त्यांना सायकल सफरीत साथ दिली. दसरा, दिवाळी हे सण दरवर्षी ते सायकल सफरीतच साजरे करतात, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील युवा सायकलपटूंना त्यांनी प्रेरणा, प्रोत्साहन दिले.