परुळेकरांनी शाश्वत विकासावर बोलू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळेकरांनी शाश्वत विकासावर बोलू नये
परुळेकरांनी शाश्वत विकासावर बोलू नये

परुळेकरांनी शाश्वत विकासावर बोलू नये

sakal_logo
By

55967
विजय केनवडेकर

परुळेकरांनी शाश्वत विकासावर बोलू नये

विजय केनवडेकर ः सुरेश प्रभूंवरील टिकेला उत्तर


सावंतवाडी, ता. १२ ः माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका करणाऱ्या डॉ. जयेंद्र परुळेकर यांना शाश्वत विकास काय आहे, हे समजलेले नाही आणि समजणारही नाही. कारण कळणे मायनिंगमध्ये आंदोलन उभे करून त्यांनी नंतर राजकीय फायदा कसा घेतला, हे इथल्या जनतेला माहित आहे. जनतेला भडकवून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या परुळेकर यांनी शाश्वत विकासावर बोलू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकातून दिले आहे.
श्री. परुळेकर यांनी शाश्वत विकासावरुन माजी केंद्रीय मंत्री प्रभू यांच्यावर केलेल्या टिकेला श्री. केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, माजी मंत्री प्रभू यांनी रेल्वे कोच बांधणी प्रकल्प हा रत्नागिरी-लोटे या ठिकाणी कार्यान्वित करून घेतला होता. त्याचे काम पूर्णत्वास येऊन कोच तयार करण्याचा कारखाना थोड्याच दिवसात सुरू होणार आहे, हे परुळेकरांना माहित नाही. रेल्वे कोच प्रकल्पासाठी आवश्यक मोठी जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एमआयडीसीमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे हा प्रकल्प लोटे येथे नेण्यात आला. शाश्वत विकास ही संकल्पना प्रभू यांनी १९९५ ला जनतेसमोर मांडली होती. त्यावेळी हेच परुळेकर शाश्वत विकासाबाबत चेष्टा करण्यापलीकडे काही करत नव्हते.
श्री. केनवडेकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, प्रभू यांनी पाच वेळा खासदार होऊन केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून देशाला वेगळे नेतृत्व देण्याचे काम केले. त्यांचे काम जगजाहीर असून वेळोवेळी त्यांचा गौरव सर्व जगामध्ये केला जात आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या दौऱ्यात खरा विकास काय असतो, हे पाहण्यासाठीच भारतातील बऱ्याच कंपन्या सिंधुदुर्गनगरी येथे आल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्षपणे कुठले उपक्रम कशाप्रकारे सुरू झाले आहेत आणि त्यांना आधुनिकतेचे कसे बळ देणे आवश्यक आहे, यासाठी या कंपन्या प्रभू यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आल्या होत्या.
जिल्ह्यात बचत गटाचे जाळे विणण्याचे काम प्रथम प्रभू यांनी केले. त्याचबरोबर तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झाले पाहिजे म्हणून जन शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळे आवश्यक असणारे कोर्स देऊन युवकांना, महिलांना सक्षम करण्याचे काम प्रभूंनी केले. त्याचबरोबर लुपिन फाउंडेशनसारख्या कंपनीला सीएसआर फंड देऊन त्यांना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना क्लस्टर मार्फत मदत करण्याचे काम करण्यात आले. सुतार समाजातील लोकांचा महाराष्ट्रातला पहिला क्लस्टर करण्यात आला. सिंधुदुर्गात अणाव येथे पहिले नर्सिंग कॉलेज प्रभूंनी आणले. ते आता यशस्वीपणे सुरू असून १०० टक्के निकाल त्याचबरोबर कोणतेही डोनेशन न घेता हे कॉलेज चालवले जात आहे. सावंतवाडी-मळगाव स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला. कोकण रेल्वे विद्युतीकरणासाठी खास तरतूद करण्यात आली. कोकण रेल्वेच्या डबल ट्रॅकसाठी नियोजन करण्याचे काम प्रभूंनी केले. अशाप्रकारे कोकणच्या विकासासाठी भरीव काम करत असताना सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल, यासाठी कटाक्षाने लक्ष दिले. हे सगळे परुळेकरांना समजण्यापलीकडचेच आहे. कारण परुळेकरांनी जेवढ्या योजना करणार म्हणून घोषित केल्या, त्यापैकी एकही योजना अस्तित्वात आलेली कधी दिसली नाही.