गटशेतीतून समृद्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटशेतीतून समृद्धी
गटशेतीतून समृद्धी

गटशेतीतून समृद्धी

sakal_logo
By

56021
विलास सावंत

गटशेतीतून समृद्धी

लीड
दिवसेंदिवस शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीमध्ये भरमसाठ खर्च होत आहे. शाश्वत मनुष्य बळ उपलब्ध होत नाही. बी-बियाणे, खते, कीटकनाशके महागली असून त्यांच्या गुणवत्तेमध्ये फसवणूक होते. जंगली प्राण्यांचा त्रास दिवसेंदिवस अधिक जटील होत आहे. बदलते हवामान व निसर्गाचा लहरीपणा याचा शेती उत्पन्नावर विपरित परिणाम दिसून येत आहे. तसेच पीक उत्पादनाला शाश्वत हमीभाव मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहेत. म्हणून पडीक जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिकीकरणानंतरच्या काळात शेती व्यवसाय हा स्पर्धात्मक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुसत्या शेतीवर उपजीविका करणे कठीण झाले आहे. यावर उत्तम पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी गट शेतीकडे वळले पाहिजे. शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्याने एकत्रित येऊन गटशेती करावी.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस‍
...................
भारतात लहान म्हणजे अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या ८६ टक्के आहे. त्यामुळे वैयक्तिकरित्या शेती करणे परवडत नाही. त्यावर मात करण्यासाठी गटशेतीची संकल्पना पुढे आली आहे. गेली अनेक वर्षे केंद्र व राज्य सरकार गटशेतीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचे धोरण राबवत आहे. जागतिकीकरणामुळे बाहेरील देशांचा कृषिमाल आपल्या देशात येण्यास मुभा आहे. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते. परिणामी बरेचदा स्थानिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडतात व स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात माल विकणे परवडत नाही. त्यामुळे शेतीत बहुतांशी तोटा जाणवत आहे. जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी शेतकऱ्यांना आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. फायद्याची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आयात मालाशी स्पर्धा करावीच लागेल. तसेच आपल्या मालाच्या निर्यातीची तयारी ठेवावी लागेल. समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करावी व पुढे त्यातून उत्पादक कंपनी स्थापून शेतीचे रुपांतर उद्योगात करावे. जागतिक स्पर्धेत शेती उद्योग टिकवण्यासाठी हाच पर्याय असून सरकार यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ देत आहे. गटशेतीद्वारे शेतीचे एकत्रित व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात बचत करता येते. एकत्रित काढणी, प्राथमिक प्रक्रिया, वाहतूक व विक्री करता येते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा शोध घेऊन शेत माल विक्री करार करता येतात. गटाद्वारे स्वत:चा प्रक्रिया उद्योग उभारता येतो. वैयक्तित शेती करताना सर्व जबाबदारी एकट्याला पेलावी लागते. गटशेतीमध्ये सर्व सभासद त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी वाटून घेतात. त्यामुळे एकट्यावर कामाचा बोजा येत नाही. यामुळे पिकांचे काटेकोर नियोजन करून सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. उत्पादित मालाचा दर्जा सुधारतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. गटशेतीद्वारे शेतीची मशागत, पेरणी, निंदणी, आंतरमशागत, काढणी, मळणी, हाताळणी, स्वच्छता, प्रतवारी, पॅकेजिंग, लेबलिंग व साठवण इत्यादी कौशल्याधारित कामे सुलभ पद्धतीने करता येतात. अर्थातच एकत्रित पद्धतीने शेती व पिकांचे नियोजन चांगले होते. पाणी व जमीन वापराची कार्यक्षमता वाढते. परिणामी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची ताकद वाढते. संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करणे अपरिहार्य मार्ग आहे.