सिंधुदुर्गाच्या कृषी यंत्रणेवर ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गाच्या कृषी यंत्रणेवर ताण
सिंधुदुर्गाच्या कृषी यंत्रणेवर ताण

सिंधुदुर्गाच्या कृषी यंत्रणेवर ताण

sakal_logo
By

सिंधुदुर्गाच्या कृषी यंत्रणेवर ताण
रिक्त पदे ः सर्वच प्रवर्गातील तब्बल २८५ पदांना वाली नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील तब्बल २८५ पदे रिक्त आहेत. ४७ हजार ७२५ पेरणीक्षेत्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदांमुळे खिळखिळा झाला आहे. रिक्‍त पदांचा अनुशेष वाढल्याने शेतकऱ्यांची कामेही प्रभावित झाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केल्याने चांगली प्रसिद्धी मिळते, परिणामी भावी नेते, अशी शेखी मिरविणाऱ्यांकडून कृषी विभागाला टार्गेट केले जाते. जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आंदोलनाचा ससेमिरा उपलब्ध अधिकाऱ्यांच्या मागे लागून त्यांच्यावर अतिरिक्त ताणही येत आहे.
काही तालुक्यांचा कारभार प्रभारीवर आहे. याचा ताण प्रभारींना असह्य होत आहे. जिल्ह्यातील एकूण ८ पैकी ४ तालुका कृषी अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. परिणामी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ व इतर कामांसाठी कृषी कार्यालयात खेपा घालाव्या लागत आहेत. कृषी विभागाकडे यापूर्वीच दीडशेपेक्षा अधिक योजनांचा भार आहे. अशातच शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या कामाचा भारही त्यांना सहन करावा लागतो. अशातच पीएम किसान सन्मान योजनेचे कामही कृषी विभागाच्या खांद्यावर आल्याने प्रभारी अधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. जिल्ह्यात वर्ग एक अधिकारी इतपासून ते कनिष्ठ पदांपर्यत ५६८ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या २८३ पदे भरलेली आहेत. तब्बल २८५ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली.
मागच्या सरकारने राज्यात ७० हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. यातून रिक्त पदाची समस्या मार्गी लागेल, अशी आशा असली तरी अंमलबजावणी कधी होईल? यावर प्रश्‍नचिन्ह आहे. शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांसाठी भरती करण्यात येते; मात्र कृषी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कुठल्याही प्रकारची जाहिरात निघालेली नाही. अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवजारांच्या साह्याने श्रम व मनुष्यबळ कमी झाल्याने शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले आहे व त्यातच बेरोजगारीचा मुद्दा समोर असल्याने युवापिढीही कृषिक्षेत्राला रोजगार म्हणून बघत आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या शेतकरी आणि शासन यामधील महत्त्वाचा दुवा समजला जात आहे.
-------------
कृषी विकासात अडसर
शेतकरी व शासनाच्या योजना यामध्ये महत्त्वाचा घटक हा शासकीय अधिकारी व कर्मचारी असतात. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे प्रमुख कार्य हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असते. विशेषतः कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी अशा पदावर कार्यरत असलेले अधिकारी हे यात प्रामुख्याने जबाबदारी पार पडतात. असे असतानाही रिक्त पदांमुळे कृषी क्षेत्राला विकासाचा अडसर म्हणून या रिक्त पदांची बाब पुढे येत आहे.
------------
विकासाला चालना मिळेना
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही तालुक्‍यात पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे कृषी विकासाला मर्यादा आहेत. काही तालुक्‍यात कृषी क्षेत्राला अनुकूलता असूनही त्याठिकाणी कृषी अधिकारी कर्मचारी नसल्याने त्या भागाला आर्थिक विकासाची चालना मिळत नाही. समुद्र किनारा असल्याने वातावरणातील बदल येथे वेगाने होतात. याचा थेट परिणाम येथील कृषी क्षेत्रावर दिसून येतो. प्रामुख्याने खरीप हंगामातील भात पिकासह इतर पिकावर कायम धोक्‍याची व नुकसानीची टांगती तलवार बनून राहिलेली असते. जिल्ह्याचा बराचसा भाग भातपीक क्षेत्राखाली असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. वाडीवस्तीवर गावापर्यंत कृषी विभागाचा अधिकारी व कर्मचारी पोहोचणे ही गरजेची बाब समजली जाते. कमी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे सर्वच भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्‍य होत नाही. परिणामी शेतीचे पंचनामे अतिवृष्टी तसेच दुष्काळी काळात पीक कापणी प्रयोग, शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, कीड नियंत्रण मार्गदर्शन, कार्यशाळा हे उपक्रम तसेच आपत्कालीन कार्यक्रम राबविताना त्याचा प्रभाव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचताना मोठे अडचणीचे ठरते. याशिवाय आणखी बऱ्याच अडचणी येतात.
------------
चौकट
ही महत्त्वाची पदेही रिक्त
आठ तालुक्‍यातील दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि देवगड या चारही तालुक्‍यांना अद्यापही तालुकास्तरावर कारभार सांभाळणाऱ्या तालुका कृषी अधिकारी नसल्याने प्रभारी कार्यभार दुसऱ्या पदाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याकडे दिली आहे. याशिवाय बऱ्याच महिन्यापासून एकही अधिकाऱ्याचे पद जिल्ह्यामध्ये भरलेले नाही. शेतकऱ्यांच्या अत्यंत जवळचे किंवा मित्र म्हणून भूमिका बजावणारे कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांची जिल्ह्यात तब्बल ९२ पदे अद्यापही रिक्त आहेत. यात आजगाव, माजगाव, वेर्ले, तांबुळी, सातार्डा, पाडलोस, मडूरा, बांदा, घारापी, पावशी, वेताळबांबर्डे, ओरोस, चेंदवण, कडावल, निरुखे, कूपवडे, जांभवडे, पोखरण, कसाल, डिगस, आवळेगाव, आकेरी, माणगाव, वाडोस, केरवडे, नारुर, वसोली, झरेबांबर, कुंब्रल, मणेरी, आडाळी, तेरवण मेढे, दोडामार्ग, उभांदाडा, मोचेमाड, होडावडा, वेतोरे, सावडाव, कळसुली, माईण, देवगड, तळेबाजार, नारिंग्रे, मिठबांव, कोळपे आदी गावातीळ मंडल अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत
-----------
पदाचे नाव*मंजुर पदे*भरलेली पदे*रिक्तपदे
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग*१*०*१
कृषी उप संचालक*१*१*१
उप विभागिय कृषी अधिकारी*२*०*१
तंत्र अधिकारी.*६*१*१
जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी*१*१*०
तालुका कृषी अधिकारी*८*४*४
सहाय्यक प्रशासन अधिकारी*१*०*१
लेखाधिकारी*१*१*०
कृषी अधिकारी*३२*१५*१७
अधिक्षक*२*१*१
सहाय्यक अधिक्षक*८*६*२
वरिष्ठ लिपिक*१६*१५*१
लिपिक*४२*१२*३०
लघुलेखक निन्मस्तर*१*०*१
लघुटंकलेखक*२*०*२
आरेखक*१*०*१
अनुरेखक*४४*२*४२
कृषी पर्यवेक्षक*५६*४१*१५
कृषी सहाय्यक*२४९*१५१*९८
वाहन चालक*१३*४*९
टिलर ऑपरेटर*१*०*१
नाईक*१*१*०
शिपाई*६०*२५*३५
नर्सरी सहाय्यक*१६*०*१६
प्रथम श्रेणी मंजूर*३*२*१
एकूण*५६८*२८३*२८५
-------
कोट
"काही दिवसांत रिक्त पदांची समस्या मार्गी कृषी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येईल. जिल्ह्याच्या कृषी क्षेत्र विकासाच्या दृष्टीने हे पदे भरणे अत्यावश्‍यक समजून याची प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत रिक्त पदांची ही समस्या मार्गी लागेल. कृषी विभागाकडील कामाचा व्याप लक्षात घेता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास कामाला गती येईल."
- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग
--------