क्रीडा क्षेत्रातील समस्या सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा क्षेत्रातील समस्या सोडवा
क्रीडा क्षेत्रातील समस्या सोडवा

क्रीडा क्षेत्रातील समस्या सोडवा

sakal_logo
By

क्रीडा क्षेत्रातील समस्या
सोडवण्याची मागणी
समन्वय समितीने क्रीडाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विविध समस्या व अपुऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करत सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्यावतीने आज जिल्हा क्रीड़ाधिकारी विद्या सिरस यांचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीच्यावतीने आज जिल्हा क्रीड़ाधिकारी सिरस यांना निवेदन देत जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विविध समस्या व अपुऱ्या सोयी सुविधांबद्दल वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले. यात जिल्हयामध्ये २३० पेक्षा अधिक माध्यमिक शाळा असून त्यापैकी ८० पेक्षा जास्त शारीरिक शिक्षण, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागांवर तातडीने शासकीय नियमानुसार भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. कोरोना महामारीमुळे २०२०-२१ मधील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन-नियोजन न झाल्याने जिल्ह्यातील अनेक खेळाडू विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांपासून वंचित राहिले आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक तयार करताना जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक एकविध खेळ संघटनांना विश्वासात घेऊन यापुढे होणाऱ्या सर्व शासकीय स्पर्धांचे नियोजन करण्यात यावे, जिल्ह्यात दरवर्षी १० विभागीय क्रीडा स्पर्धा, ६ राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा तसेच ३ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे सर्व एकविध खेळ संघटनांना सोबत घेऊन आयोजन करावे, जिल्हा क्रीडा विभाग, सर्व खेळ संघटना व शारीरीक शिक्षक संघटनांची एकत्रित बैठक दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हावी, राज्य क्रीडा विभागाकडून सद्यस्थितीत सुरु असलेल्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, एकविध खेळ संघटना, नोंदणीकृत क्रीडा मंडळे, स्वयंसेवी संस्थांना देण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा क्रीडा विभागामार्फत राबविण्यात यावी, गुणवत्ताधारक खेळाडूंना विशेष सवलती व विमा संरक्षण तसेच विविध स्पर्धांच्या ठिकाणी प्रथमोपचार सुविधा, पाण्याची सुविधा, अद्ययावत मैदाने, चांगल्या दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून जिल्ह्यातील गरीब, गरजू, होतकरू व मेहनती खेळाडूंना याचा फायदा होईल.
जिल्हा क्रीडा संकुलात उपलब्ध सर्व सोयीसुविधा कायमस्वरुपी चांगल्या दर्जाच्या असाव्यात. सध्या खेळाडूंना विविध समस्या भेडसावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बॅटमिंटन हॉल, स्वतंत्र सैनिक हॉलची झालेली दुरवस्था, दोन्ही हॉलमध्ये पाण्याची गळती, वुडनकोर्ट व टाईल्स यांची झालेली वाताहात, निकृष्ट दर्जाचे क्रीडा साहित्य आदी समस्यांच्या निवारणासह ५०० जिल्हा क्रीडा संकुलात मुले-मुलींसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करावी, जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या सहकार्याने राज्य व राष्ट्रीय खेळाडूंसाठी शासनाच्या क्रीडा धोरणानुसार निवासी-अनिवासी क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन, जिल्हा, तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्रांचे आधुनिकीकरण, ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तेजन व प्रोत्साहनासाठी विशेष उपक्रम यांसह विविध मागण्या व समस्यांकड़े जिल्हा क्रीड़ा समन्वय समितीने लक्ष वेधले. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर यांच्यासह पधाधिकाऱी उपस्थित होते.
..............