तालुका विकासाची टीम बनवूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका विकासाची टीम बनवूया
तालुका विकासाची टीम बनवूया

तालुका विकासाची टीम बनवूया

sakal_logo
By

swt१३१४.jpg
५६२०७
कुडाळ ः ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन करताना बिडिओ विजय चव्हाण. (छायाचित्र ः अजय सावंत)

तालुका विकासाची टीम बनवूया
विजय चव्हाण ः कुडाळात ग्रामपंचायत आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः प्रशासक सरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्याच्या विकासाची टीम बनवूया, असे प्रतिपादन राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यशाळेत पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज येथे केले.
ग्रामपंचायत विभाग राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत दोन दिवशीय ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथील महालक्ष्मी सभागृहात केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी अधिकारी बाळकृष्ण परब, कुंदे सरपंच तथा प्रशिक्षक सचिन कदम, बाव सरपंच नागेश परब, भरणी सरपंच परब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. डी. जंगले, संजय आरोसकर, कुडाळ तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, "आपले सरकार आपला विकास अभियानांतर्गत आपल्याला शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्यांना कसा मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे १४ व १५ वा वित्त आयोगातील विकासकामांचा खर्च ग्रामपंचायत माध्यमातून होतो की नाही, याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. ही कार्यशाळा न होता त्यातून संवाद साधला पाहिजे. तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून त्यांचा आराखडा परिपूर्ण कसा होईल, त्याचे फायदे कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नऊ संकल्पना व पाच उद्दिष्टांवर हा आराखडा असून त्याचा अभ्यास या कार्यशाळेतून करा. प्रशासक सरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्याची विकासाची टीम केली पाहिजे." यावेळी ग्रामविस्तार अधिकारी जंगले यानी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबतीत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वालावलकर यांनी केले. सरपंच व प्रशिक्षक कदम यांनी मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गटविकास अधिकारी चव्हाण यांना वाढदिवसानिमित सरपंच, ग्रामसेवक यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.