आडाळीत भूखंडाचे वाटप कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडाळीत भूखंडाचे वाटप कधी?
आडाळीत भूखंडाचे वाटप कधी?

आडाळीत भूखंडाचे वाटप कधी?

sakal_logo
By

आडाळीत भूखंडाचे वाटप कधी?
ग्रामस्थांचा सवालः इच्छुक उद्योजक नाउमेद
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. १३ः उद्योजक आडाळीतील भुखंडासाठी प्रतीक्षेत आहेत; मात्र शासनाला भूखंड खुले करण्यासाठी वेळ नाही. इच्छुक असलेले उद्योजक नाऊमेद होऊन माघारी गेल्यावर भूखंड खुले करण्याचा मुहूर्त काढणार आहेत काय? असा संतप्त सवाल औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पराग गांवकर व प्रवीण गांवकर यांनी केला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात शासनाकडून प्रस्तावित असलेल्या अनेक विकास प्रकल्पांना स्थानिकांनी विरोध केला. रिफायनरी सारख्या तथाकथित विकास प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत, तर राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी प्रकल्प पुढे रेटत आहेत; मात्र ज्या आडाळीत स्थानिकांनी कोणताही विरोध न करता सातशे एकर जमीन दिली, त्यामध्ये उद्योग आणायचे सोडाच; पण स्वतःहून उद्योजकाना भूखंड देऊ शकले नाहीत. भूखंडांचे रेखांकन होऊन चार वर्षे झाली. पायाभूत सुविधा पूर्णतःवाच्या मार्गावर आहेत. अनेक उद्योजक आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक आहेत. ठाकरे सरकारला आम्ही अनेक निवेदने दिली. त्यांच्या काळात भूखंड खुले झाले नाहीत. आता शिंदे-भाजपचे सरकार येऊन शंभर दिवस झाले. आम्ही उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. सत्तेत सहभागी असलेल्या अन्य घटकांशी संपर्क साधून मागणी केली. मात्र, मोक्याच्या ठिकाणी उभ्या रहात असलेल्या या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबद्दल फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या १५ किलोमीटवर हे क्षेत्र असल्याने अनेक उद्योजक आज आडाळीकडे आकर्षित होत आहेत. आमच्या समितीकडे आज पन्नासहून अधिक उद्योजकांचे प्रस्ताव आहेत. शासनाचे वेळकाढू धोरण व लोकप्रतिनिधिंची उदासीनता यामुळे शेकडो स्थानिक बेरोजगारांचे रोजगार हक्क हिरावले जात आहेत. अनेक उद्योजकही आता भूखंडाची प्रतीक्षा करून थकले आहेत. आम्ही घुंगुरकाठी संस्थेअंतर्गत स्थानिय लोकांधिकार संरक्षण समितीच्या माध्यमातून बेरोजगार नोंदणी अभियान राबविले. त्यामध्ये एका आठवड्यात आठशेहून अधिक लोकांनी रोजगाराची मागणी नोंदवली. याची माहिती तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही दिली होती. तरीसुद्धा शासनाला गांभीर्य नसणे ही बाब खेद व संतापजनक आहे. त्यामुळे यापुढे आडाळी औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी जनतेला संघटित करून लढा उभारण्याचे नियोजन केले आहे. निवडणूका आणि सभामध्ये रोजगाराचा मुद्दा मांडणारे प्रत्यक्ष कृतीत मात्र कसे कमी पडतात हे जनतेपर्यंत पोहचवून जनमत संघटित करण्यात येईल. खरे तर स्थानिकांनी सकारात्मक भूमिका घेऊन शासनाला जमिनी दिल्या. त्यामुळे हे औद्योगिक क्षेत्र गतीने विकसित करून चांगले उद्योग येथे आकर्षित करून शासन एक आदर्श उदाहरण निर्माण करू शकले असते. मात्र, एवढा प्रगल्भ दृष्टीकोन आपल्या राजकीय व्यवस्थेत नसणे ही खेदजनक बाब आहे.

कोट
निवडणुकीच्या वेळी पायाभूत सुविधा उभारणी सुरु असतानाच उद्योगही उभारू, असा प्रचार करणारे लोकप्रतिनिधींना आडाळीतील उद्योगांबद्दल गांभीर्य नाही हे आता जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे सर्वपक्षीय व बेरोजगार तरुणांचे संघटन बांधून संघर्ष करण्यात येईल.
- पराग गांवकर, मुख्य समन्वयक, आडाळी औद्योगिक विकास कृती समिती