गुहागर मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला पडणार भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला पडणार भगदाड
गुहागर मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला पडणार भगदाड

गुहागर मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला पडणार भगदाड

sakal_logo
By

गुहागर मतदारसंघात उद्धव सेनेला भगदाड
अनेक कार्यकर्ते शिंदे गटात; राष्ट्रवादीचे अस्वस्थ पदाधिकारीही भेटीला
गुहागर, ता. १५ः गेल्या दोन-अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय उलथापालथ आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात होताना दिसत आहे. दिवाळीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार असल्याने गुहागर मतदारसंघाला भगदाड पडणार आहे. या संदर्भात मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.
सध्या राज्यात ठाकरे-शिंदे गट असा वाद टोकाला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदार भास्कर जाधव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आमदार जाधव यांची सेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राज्यातील घडी बसवण्यासाठी गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव सगळीकडे मेळावे घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. विरोधकांना सळो की पळो करून सोडत आहेत; परंतु, त्यांच्याच मतदारसंघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाशी जवळीक साधताना दिसत आहेत.
शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील सरपंच, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्या माध्यमातून गुहागर मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील आमदार भास्कर जाधव यांचे जवळचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. आणखी काही पदाधिकारी दिवाळीपूर्वीच शिंदे गटात दाखल होणार आहेत. आमदार जाधव एकीकडे राज्यात ठाकरेंची शिवसेना टिकवण्यासाठी जीवाचे रान करून विरोधकांना अंगावर घेत आहेत आणि त्यांच्याच मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याने आमदार जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

चौकट
शिंदे गटाच्या बैठकांना प्रतिसाद
गुहागरात शिंदे गटांच्या बैठकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिंदे गटात सक्रिय झालेले गुहागर तालुक्यातील गावोगावी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले जात आहे. शिंदे गटाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही उदय सामंत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.