बापर्डेत आज ग्रामस्वच्छता मूल्यमापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापर्डेत आज ग्रामस्वच्छता मूल्यमापन
बापर्डेत आज ग्रामस्वच्छता मूल्यमापन

बापर्डेत आज ग्रामस्वच्छता मूल्यमापन

sakal_logo
By

56542
बापर्डे : राज्यस्तरीय मूल्यमापन समितीला सामोरे जाण्यासाठी केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर यांनी गावाला भेट दिली. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच संजय लाड व अन्य.


बापर्डेत आज ग्रामस्वच्छता मूल्यमापन

राज्यस्तरीय समिती देणार भेट; सीईओ नायर यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये कोकण विभागात प्रथम येऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीचे उद्या (ता. १६) राज्यस्तरीय समिती भेट देऊन मूल्यमापन करणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी बापर्डे ग्रामपंचायतीला भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यावेळी देवगड गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच संजय लाड, ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी समिती उद्या बापर्डे गावाला भेट देणार आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रथम नागरिक या जबाबदारीने बापर्डे गावातील केलेल्या कामांची पाहणी व मागदर्शन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासक नायर व देवगड गटविकास अधिकारी चव्हाण तसेच इतर अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी गावातील धुरेवाडी अंगणवाडी व शाळा, बापर्डे पूर्ण प्राथमिक शाळा व घाडीवाडी अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला भेटी दिल्या. तसेच गावात राबविलेल्या स्वच्छता उपक्रमांना भेट दिली.
लोकसहभाग व नावीन्यपूर्ण उपक्रम या जोरावर जिल्ह्यात २०१९-२० मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवत बापर्डे गावाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. नैसर्गिक विविधता लाभलेला, काजू-आंबा उत्पादनाने श्रीमंत असलेला बापर्डे गाव मुळात स्वच्छ व सुंदर आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बापर्डे व जुवेश्वर असे दोन महसुली गाव आहेत. बापर्डे गावातील शाळा, अंगणवाडी या लक्षवेधी व आदर्शवत तयार करण्यात आल्या आहेत. या ज्ञानमंदिराच्या भिंतीही बोलक्या आहेत. संरक्षक भिंती सुद्धा बोलतात. विशेष म्हणजे शैक्षणिक उठाव करीत गावात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी श्री देवी पावणादेवी शिक्षण विकास मंडळाने सुरू केलेले यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डे हा उपक्रम सर्वांनाच सामाजिक भान दाखविणारे आहे. खासगी शाळा चालविताना तब्बल एक कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. शिक्षकांचे पगार यातून दिले जातात. हा उपक्रम बापर्डे गावाच्या स्वच्छता चळवळीत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून भर घालत आहे.
गावात वाडीवाडीतील रस्ते स्वच्छ व दुतर्फा असलेल्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी केली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावाने विकसित केलेला ''मॅजिक पीट प्लस'' हा उपक्रम सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन करताना दिसतो. त्यामुळे सांडपाणी मार्गी लागलेच; पण दुर्गंधी सुद्धा बंद झाली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत युनिट, कचरा कुंडी, बायोगॅस हे उपक्रम यशस्वी राबविले आहेत. ''रेनवॉटर हार्व्हेस्टिंग''च्या माध्यमातून पाण्याचे पुनर्भरण केले आहे. तसेच वेगळीकता दर्शविणारा कचरा कटर मशीन हा उपक्रम सुद्धा आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, हागणदारीमुक्त पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार आदी पुरस्कार मिळवित गावाने यापूर्वीच एकीचे बळ सिद्ध केले आहे. महिलांसाठी पेपरलेस व आयएसओ मानांकन ग्रामपंचायत हे वेगळे पुरस्कार मिळविले आहेत.
सॅनिटरी पॅड मशीन बसवत एका सामाजिक विषयाला विशेषतः महिलांच्या आरोग्याला पोषक ठरेल, असा उपक्रम राबविला आहे. अशाप्रकारे तयारी करून बापार्डे आज राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मूल्यमापनाकरिता सज्ज झाला आहे. प्रशासकीय पातळीवर देवगड पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे योग्य सहकार्य लाभत असल्याने ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी सांगितले.
...............
चौकट
तीन सदस्यीय समिती
राज्यस्तरीय समितीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव समिती तथा अध्यक्ष यांचे प्रतिनिधी चंद्रकांत मोरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी तथा समिती सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब हजारे, याच विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी तथा सदस्य प्रतिनिधी रमेश पात्रे यांचा समावेश आहे.