पावस-राष्ट्रवादी 6 महिने युवक जिल्हाध्यक्षाच्या शोधात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-राष्ट्रवादी 6 महिने युवक जिल्हाध्यक्षाच्या शोधात
पावस-राष्ट्रवादी 6 महिने युवक जिल्हाध्यक्षाच्या शोधात

पावस-राष्ट्रवादी 6 महिने युवक जिल्हाध्यक्षाच्या शोधात

sakal_logo
By

राष्ट्रवादी सहा महिने युवक जिल्हाध्यक्षाच्या शोधात

निवडणुकांआधी पद कोणाला ; दक्षिण रत्नागिरीत अनेक इच्छुक
पावस, ता. १६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष योगेश शिर्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सहा महिने झाले तरी जिल्ह्याला नवा युवक जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर युवक जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
गेले अडीच वर्ष राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याला विकास कामांसाठी निधी मिळत होता असे असताना या जिल्ह्यांमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होईल अशी अपेक्षा होती. सध्या चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्यामुळे संघटना बांधणीच्या दृष्टीने चांगली गती मिळण्यास सुरवात झाली होती. गुहागर, मंडणगड, दापोली, खेड व चिपळूण या भागाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे करीत असल्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात होते. त्याला विकासकामांच्या माध्यमातून चांगली गती प्राप्त होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्राधान्याने या परिसरात निधी दिला जात होता. असे असताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटना बांधणीच्या माध्यमातून चांगली गती प्राप्त होण्यासाठी युवक राष्ट्रपती काँग्रेस बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. युवक फळी मजबूत करण्यासाठी अध्यक्ष निवडीकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक युवक या पदासाठी इच्छुक होते व त्यादृष्टीने हालचाली सुरू होत्या. उत्तर विभागामध्ये खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांनी इच्छुक उमेदवारांना डावलून गुहागरच्या योगेश शिर्के यांची रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे दक्षिण भागातील संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांवर अन्याय झाला. या तालुक्यांमध्ये संघटना वाढवणे फार गरजेचे असताना नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या युवा नेत्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे युवकांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले.

तातडीने नियुक्तीची मागणी
तटकरेनी ज्या विश्वासाने शिर्के यांच्यावर जबाबदारी टाकली, त्या कामांमध्ये शिर्के यशस्वी होऊ शकले नाहीत व विविध कारणे सांगून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेले सहा सात महिने हे पद रिक्त असल्यामुळे युवकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्यास खीळ बसल्याचे चित्र दिसत आहे. तातडीने या पदावर नव्याने नेमणूक करून द्यावी, अशी मागणी होत आहे.