वाचन प्रेरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन प्रेरणा
वाचन प्रेरणा

वाचन प्रेरणा

sakal_logo
By

56910
वृंदा कांबळी


वाचन प्रेरणा

लीड
मी पूर्वी कुडाळ ते वेंगुर्ले असा एसटीचा प्रवास रोज करत होते. गाडी तर नेहमीच खचाखच भरलेली असायची. कॉलेजला जाणाऱ्या - येणाऱ्या मुलांच्या मस्तीने, गडबडीने वातावरणात आणखीनच चैतन्य यायचे. मला त्या कॉलेजमधील मुलामुलींशी ओळख करून घ्यायला व गप्पा मारायला, त्यांच्या जगात डोकावायला आवडायचे. शेजारी कोणी मुलगा-मुलगी असली की मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात करायची. मी माझी लेखिका ही ओळख मात्र सांगत नसे. कारण ती सांगितली तर ते माझ्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. मला ते लेखिका म्हणून ओळखत नाहीत, याची मला खात्री होती.
- सौ. वृंदा कांबळी
............
बोलता बोलता मी माझ्या मूळ विषयाकडे येत असे. ‘‘तू काय वाचतोस? वाचतेस?’’ या माझ्या प्रश्नावर नकारात्मक उत्तर ठरलेले असे. एक मात्र खरे की, मी माझी ओळख स्पष्ट न केल्याने ते तरुण-तरुणी अगदी प्रामाणिकपणे आणि मोकळेपणी माझ्याशी बोलत. ‘‘मला वाचन करायला आवडत नाही,’’ असे काही अपवाद वगळता उत्तर येत असे. त्यामुळे या युवा वर्गासमोर त्यांनी वाचावे म्हणून आपण काहीतरी उपक्रम ठेवले पाहिजेत, या विचाराने मी झपाटली गेले. मी स्थापन केलेल्या ‘आनंदयात्री’ वाड़्मय मंडळात अनेक साहित्य विषयक उपक्रम राबविले जातात; पण ते खूपच मर्यादित झाले. वाचनासाठी युवा वर्गाने प्रेरित व्हावे, यासाठी खूप मोठ्या व्यापक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. दरवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात; पण काही अपवादात्मक पुस्तके वगळता अन्य पुस्तके वाचनालयांच्या कपाटात पडून राहतात. वाचनाला प्रेरणा मिळेल, असे उपक्रम व्यापक पातळीवर राबविले पाहिजेत. अनेक संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यक्रम केले जातात; पण त्याचा परिणाम मर्यादित स्वरुपात होतो. यासाठी विविध विषयांवर युवकांच्या स्पर्धा ठेवणे, त्यांना वाचनीय पुस्तके पुरवणे, वाचनासाठी विविध प्रलोभने ठेवणे, आकर्षक बक्षिसे ठेवणे आदी उपायांनी थोडा परिणाम साधला जाऊ शकेल; पण वाचनाचे महत्त्व सांगणारी व्याख्याने, पथनाट्ये, गीते, नाटिका अशा विविध मार्गांनी वाचनाचे महत्त्व उमलत्या बुद्धीच्या उगवत्या पिढीपुढे ठेवले पाहिजे. आज सोशल मीडियाचा सर्वांवरच जबरदस्त पगडा आहे. करमणुकीचे अनेक पर्याय समोर आहेत. त्यामुळे पुस्तक उघडून वाचावे, एवढे श्रम कोणी घ्यायला बघत नाहीत. ते त्यांनी घ्यावेत, इतर प्रलोभनांतून बाजूला होऊन पुस्तकांकडे वळावे, यासाठी तसेच आकर्षण ठेवावे लागेल. युवकांनी नेमके काय वाचावे, हे सांगणारी व्याख्याने, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स दाखविणे यासारखे प्रयत्नही करता येतील. बुद्धिवंतांची व चांगल्या वक्त्यांची व्याख्याने त्यांना ऐकवणे हे करता येणे शक्य आहे. नुसतेच युवा पिढीवर टीका न करता वाचनासाठी त्यांना प्रेरणा देताना काय काय करता येणे शक्य आहे, याचाही विचार व्हावा. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक युवकांच्या विचारांना दिशा देणारे आहे. अच्युत गोडबोले यांची पुस्तके तसेच कथा कांबऱ्या असे कलात्मक साहित्य यांची उदाहरणे देऊन त्यांना वाचायला प्रवृत्त केले पाहिजे. सुरुवातीला असे औपचारिक प्रयत्न करावे लागतील. एकदा का वाचनाची गोडी लागली की, नक्की ते वाचतील. आजच्या युवकांकडे असलेली शक्ती संघटित करून त्या शक्तीला वाचनाकडे वळवणारी समर्थ शक्ती असायला हवी. आजची युवा पिढी संवेदनशील आहे. त्यांच्या मनावर चांगले विचारबीज पेरले तर ते रुजवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांची घेण्याची ताकद आहे. देणारे त्यांना रुचेल अशा शब्दांत देण्यास किती सक्षम आहेत, यावर परिणाम अवलंबून आहेत. म्हणूनच आम्ही युवकांना पुस्तकांकडे वळवण्यासाठी, त्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी व्यापक पातळीवर कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत.
---
सातत्य हवे...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात. हे एक आश्वासक चित्र दिसते; पण केवळ एकच दिवस कार्यक्रम घेऊन थांबू नये. हेच प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले पाहिजेत. त्या उपक्रमांमध्ये आपण सातत्य ठेवले तर त्याचा परिणाम होऊ शकेल. माहितीपर पुस्तके, आणि त्याचबरोबर प्रतिभेचा सुंदर विलास असणारी पुस्तके वाचली गेली पाहिजेत. यासाठी व्यापक पातळीवर व सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत.