डी.एड. बेरोजगारांना वाली कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी.एड. बेरोजगारांना वाली कोण?
डी.एड. बेरोजगारांना वाली कोण?

डी.एड. बेरोजगारांना वाली कोण?

sakal_logo
By

56908
कुडाळ ः डी.एड. संघर्ष समितीच्या विशेष बैठकीत मार्गदर्शन करताना पदाधिकारी.

डी.एड. बेरोजगारांना वाली कोण?

कुडाळात प्रश्न; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः आज तब्बल दहा वर्षे शिक्षक भरती न झाल्यामुळे सिंधुदुर्गातील डी.एड. उमेदवारांची नोकरीला लागण्याची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यामुळे डी.एड. बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. जिल्ह्यातील आमदार, विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्थानिकांना न्याय देतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षक घोटाळ्यात सिंधुदुर्गातील उमेदवारांचा दोष नसताना इतर जिल्ह्यांचा दोष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी का? असा प्रश्न डी.एड. बेरोजगारांनी आज येथे बैठकीत केला.
डी.एड. संघर्ष समितीची विशेष बैठक येथील पाटेश्र्वर मंदिरात झाली. या बैठकीत स्थानिक भरतीबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. शिवाय यावेळी शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन पूर्वीप्रमाणे सेवा आयोजन कार्यालयामार्फत जिल्हा निवड मंडळामार्फत स्थानिक पातळीवर डी.एड.च्या मेरीटप्रमाणे स्थानिकांमधूनच भरती करावी. टी.ई.टी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात बोगस प्रमाणपत्रांचा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे ही परीक्षा मारक आहे. असा प्रमाणपत्रांचा घोळ असलेली परीक्षा व यंत्रणा विश्वासार्ह नाही. तसेच ही परीक्षा देण्यातच सर्वसामान्य बेरोजगारांच्या खिशाला मोठी कात्री लागलेली आहे. त्यामुळे ही टी.ई.टी. अट रद्द करून जिल्हा पातळीवर सेवा आयोजन कार्यालयामार्फत पूर्वीप्रमाणेच डी.एड. पदविका मेरीटचा विचार करून स्थानिकांमधूनच शिक्षक भरती करावी. सद्या ० ते २० पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद केल्या तर जिल्ह्यात बरेच शिक्षक अतिरिक्त होतील. परिणामी भरती प्रक्रिया देखील होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा डोंगरी निकष पाहता कमी पटसंख्या असलेल्या वाडीवाडीत असणाऱ्या मराठी शाळा बंद करून बालकांना शिक्षणापासून वंचित करू नये, असे समितीने म्हटले आहे.
या बैठकीस सहदेव पाटकर, अमृता तेली, स्वराली वाक्कर, रामचंद्र गोसावी, पूजा कुडाळकर, रेवती दरोडे, ऋषिकेश पावसकर आदी डी.एड. धारक उपस्थित होते. हा लढा प्रामुख्याने जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांसाठीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व डी.एड. धारकांनी एकत्रित होउन खंबीर पाठिंबा द्यावा, असे सहदेव पाटकर यांनी स्पष्ट केले. यासाठी सहदेव पाटकर, विजय फाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
---
स्थानिकांमधूनच पदे भरा
जिल्हा परिषद गट-क संवर्ग सर्व पदांची भरती शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीमार्फत आहे; पण शिक्षक हे पद गट-क वर्गात मोडत असूनही त्यातून वगळले आहे. त्यामुळे शिक्षक पद त्यात समाविष्ट करून जिल्हास्तरावर स्थानिकांमधून भरती करावी. सिंधुदुर्ग डोंगरी भागाचे निकष, बोलीभाषा लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून तत्काळ स्थानिकांमधूनच शिक्षक पदे भरावीत, अशी मागणी यावेळी केली.
---
...तर पदविका शासनाला देऊ
शिक्षक होण्यासाठी पूर्वी डी.एड. हीच अहर्ता होती, तीच अहर्ता विचारात घ्यावी. गेली दहा वर्षे भरती न झाल्यामुळे स्थानिकांमधून भरती न केल्यास डी.एड. पदविका शासनाला सुपूर्द केल्या जातील. अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच लवकरच जिल्हास्तरावर सभा आयोजित करून सर्व तालुक्यांची मिळून एक मोठी सभा घेऊन या सर्व बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे, असे कुडाळ डी.एड. संघर्ष समितीने म्हटले आहे.