
बांधकाम कामगारांचा डिसेंबरमध्ये मेळावा
57164
ओरोस ः बांधकाम कल्याणकारी संघाच्या बैठकीत मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर व उपसमितीचे पदाधिकारी.
प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न
ओरोसला बांधकाम कामगारांची बैठक; डिसेंबरमध्ये मेळावा, शासनाच्या विविध योजनांबाबत करणार चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचा मेळावा डिसेंबरमध्ये घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. तळागाळातील प्रत्येक बांधकाम कामगारांच्या शासन दरबारी असणाऱ्या न्याय्य मागण्या मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी संघाचे तळागाळात काम अधिक जलदरीत्या होण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली.
बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग संघटनेतील कार्यकारिणी सदस्यांची व जिल्ह्यातील सक्रिय बांधकाम कामगार कार्यकर्त्यांची सहविचार सभा काल (ता.१७) बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विस्तार अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे मुख्य कार्यालय, रवळनाथ मंदिर ओरोस येथे झाली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, सचिव रवींद्र साळकर, सहसचिव दीपक गावडे, खजिनदार प्रदीप तांबे, सदस्य शशिकांत राऊळ, विलास गुरव, बाप्पा पाताडे, अनिल कदम आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. नांदोसकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ग्रामीण भाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध योजना तळागाळात पोचण्यासाठी बांधकाम कामगारांची उपसमिती गठित केली आहे. कामगारांचे विविध प्रश्न शासन दरबारी गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न सुटावेत, या दृष्टिकोनातून आम्ही येथील स्थानिक आमदार व खासदार यांच्या माध्यमातून कार्यरत आहोत. तळागाळातील बांधकाम कामगार संघाच्या प्रत्येक कामगाराला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उपसमितीच्या माध्यमातून शासनाच्या काय योजना आहेत त्या त्याच्यापर्यत पोचाव्यात यासाठी डिसेंबरमध्ये मेळावा घेण्यात येणार आहे.’’
बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांसंदर्भातील अन्यायकारक नियम व अर्ज मंजुरीची क्लिष्ट पद्धत यावर चर्चा करणे, २०१८ व २०१९ मधील शैक्षणिक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी शासन दरबारी निवेदन देणे व निर्णय घेण्यास भाग पाडणे, संघटनेची २०२३ साठी दिनदर्शिका प्रकाशित करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. कृषी विस्तार अधिकारी चव्हाण यांनी सुद्धा बांधकाम कामगारांच्या विविध योजना शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले. सचिव रवींद्र साळकर यांनी आभार मानले.
------------
चौकट
उपसमिती गठीत
या बैठकीत जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीच्या संमतीने उपसमिती गठीत करण्यात आली. यामध्ये विनायक मेस्त्री, मुरारी गावडे, तुळशीदास पवार, रवींद्र चव्हाण, राजेंद्र पडवळ, निकिता गावकर, प्रज्ञा सावंत, गौरी सामंत, राजाराम नाचणकर, सुहास मेस्त्री, महादेव वरावडेकर, बाळकृष्ण मेस्त्री, विठ्ठल चव्हाण, लक्षा मेस्त्री, गौरव मेस्त्री, विठ्ठल चव्हाण, अभिमन्यू गावडे यांचा समावेश आहे.