
संक्षिप्त-2
झोळंबेत भजन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी ः झोळंबे गावातील भजनप्रेमी आणि झोळंबे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० ला खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये, द्वितीय ३३३३ रुपये, तृतीय २२२२ रुपये, तसेच उत्तेजनार्थ ११११ रुपयांची दोन पारितोषिके, स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, गौळण गायक, हार्मोनियम, तबला, पखवाज, कोरस, झांज, श्रोते यांना रोख रकमेची पारितोषिके आहेत. सागर झोळंबेकर यांच्याकडे नावनोंदणी करावी.
आडेली-वजराट रस्ता सुरळीत
वेंगुर्ले ः बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातर्फे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या उपस्थितीत आडेली-भंडारवाडी ते वजराट तिठा रस्त्याचे दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाईचे काम भंडारवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने केले. या सामाजिक कामासाठी आडेली-भंडारवाडी ते वजराट तिठा भागातील गजानन बांदिवडेकर, योगेश कुबल, स्वप्नील नाईक, सावळाराम बोवलेकर, भारत धर्णे, संदीप कांबळी, मिलिंद कुबल, जयानंद सावंत, संदेश टेमकर, शिवराम मांजरेकर, रुपेश सावंत, बाबा टेमकर, अक्षय सावंत, अजय टेमकर, कुमा वाडकर, आबा वाडकर, केशव सावंत यांनी सहभाग घेतला.
तुळस परिसरात बिबट्याचा वावर
वेंगुर्ले ः गेल्या वर्षभरामध्ये तुळस रामघाट परिसर व नजीकच्या वाडी-वस्त्यांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर सुरू असून, बिबट्याच्या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. तुळसमधील रामघाट परिसरातील राऊळवाडी, पांडेपरबवाडी व सुतारवाडीमध्ये रात्री भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा वावर सुरू आहे. अनेकांना या बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले आहे. सध्या आंबा, काजू बागांमध्ये औषधांची फवारणी व साफसफाईची कामे सुरू झाली असून, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण आहे.