शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली
शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली

शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली

sakal_logo
By

57291
वैभववाडी ः जिल्ह्यात पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे भातपिकाला आता कोंब फुटु लागले आहेत.

शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली

पावसाची झोड सुरुच; भातपिकाला कोंब फुटण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ ः गेले काही दिवस दुपारनंतर पडणाऱ्या परतीच्या पावसाने आज जिल्ह्यात सकाळीच हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. परतीच्या पावसामुळे कोसळलेल्या भातपिकाला कोंब फुटण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाची झोड सुरू आहे. परंतु, आतापर्यत दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने आज सकाळी आठ वाजल्यापासूनच हजेरी लावली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारी बारा वाजेपर्यत काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. मात्र, सायंकाळी साडेतीन वाजल्यानंतर पुन्हा विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली. कणकवली, कुडाळमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या भागात विजांचा कडकडाट देखील अधिक झाला. सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भातपिक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात ८० टक्के भातपिक परिपक्व झालेले आहे. परंतु, पावसामुळे कापणी रखडली आहे. काही शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू देखील केली होती. परंतु, पावसामुळे त्यांना थांबवावी लागली. अनेक भागात भात जमिनीवर कोसळले आहे. कोसळलेल्या भातपिकाला आता कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधील अस्वस्थता दिवसागणीक वाढताना दिसत आहे.
---------
चौकट
पावसाचा मुक्काम वाढणार
जिल्ह्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना आता या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब मानली जात आहे.