kokan : चिपळुणात साकारणार वनउद्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan
चिपळुणात साकारणार वनउद्यान

kokan : चिपळुणात साकारणार वनउद्यान

चिपळूण : येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत वनउद्यान उभारले जाणार आहे. हे उद्यान चिपळूण परिसरातील आबालवृद्धांसाठी विरंगुळ्याचे महत्त्‍वाचे ठिकाण ठरेल, अशी माहिती विभागीय वनाधिकारी दीपक खा़डे यांनी ‘सकाळ’ला दिली. मार्कंडी येथे वनविभागाचे विभागीय वनाधिकारी यांचे कार्यालय आहे. कार्यालय परिसराची एकूण जागा अडीज हेक्टर इतकी आहे. या जागेत परिक्षेत्र वनाधिकारी आणि विभागीय वनाधिकारी यांचे कार्यालय आहे. जिल्ह्यात आढळणारे पक्षी, प्राणी आणि वनसंपदेची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून या कार्यालयांच्या इमारती रंगवण्यात आल्या आहेत.

उर्वरित जागा मोकळी आहे. या मोकळ्या जागेत वनउद्यान उभारण्यात येणार असल्याचे खाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, वनविभागाने वनउद्यान उभारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या उद्यानासाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चार वर्षांत हे उद्यान उभारले जाणार आहेत. पहिल्या वर्षी विविध प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत. पहिल्या वर्षी झाडे लावल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या घेऊन पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

भव्य प्रवेशद्वार, निसर्ग पाऊलवाट, ठिकठिकाणी बसण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचे आसन, स्वच्छतागृह, खेळणी, वन्यप्राण्याचे पुतळे, पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती, कृत्रिम धबधबे, दगडाच्या कलाकृती यांसह अन्य आकर्षक बाबी या उद्यानात असणार आहेत. फुलझाडांची लागवड केली जाणार आहे.

प्रामुख्याने दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. चार वर्षात हे उद्यान उभे राहिल्यानंतर नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यामुळे आबालवृद्धांसाठी हे उद्यान विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

लोकांना ऑक्सिजनची किंमत कळावी, वृक्षसंपदा आणि पर्यावरणाचे जतन करण्यात लोकसहभाग वाढावा यासाठी आम्ही विविध उपाययोजना करत आहोत त्याचाच हा एक भाग आहे.

- दीपक खाडे, विभागीय वनाधिकारी चिपळूण