‘निवती’वर २४ ला आरमार दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘निवती’वर २४ ला आरमार दिन
‘निवती’वर २४ ला आरमार दिन

‘निवती’वर २४ ला आरमार दिन

sakal_logo
By

मातोंड सातेरीचा नोव्हेंबरला जत्रोत्सव
वेंगुर्ले ः दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान तसेच लोटांगणाच्या जत्रोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या मातोंड येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबरला होणार आहे. यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मातोंड गावच्या सातेरी देवीचा जागृत देवस्थान म्हणून नावलौकीक आहे. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो. जत्रोत्सवादिवशी सकाळपासून ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री आठला सवाद्य देवीच्या उत्सवमूर्तीचे मंदिरात आगमन त्यानंतर रात्री अकराला मंदिर परिसरात दीपोत्सव, पालखी सोहळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे हजारो भाविक निर्जळी उपवास करून रात्री मंदिराभोवती लोटांगण घालून नवस पूर्ण करतात. त्यामुळे ही जत्रा ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मंदिराभोवतालची विद्युत रोषणाईही व फटक्यांची आतषबाजी हे खास आकर्षण ठरते. या जत्रेसाठी मुंबई, गोवा व कर्नाटक भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. तरी या जत्रोत्सवादिवशी भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातोंड गावकर मंडळी व देवस्थान कमिटी मातोंड यांनी केले आहे.
------------------------
‘निवती’वर २४ ला आरमार दिन
सावंतवाडी ः भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ ला भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती केली. या घटनेला ३६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागातर्फे सोमवारी (ता.२४) निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवरायांच्या या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी शिवप्रेमी सोमवारी (ता.२४) दुपारी दोनला पिंगुळी म्हापसेकर तिठा येथून प्रस्थान करणार आहेत. दुपारी तीनला किल्ले निवती गडावर पोहचल्यानंतर किल्ल्याची स्वच्छता व सजावट करण्यात येणार आहे. त्यानंतर चारला महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरमार दलात काम केलेल्या मावळ्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाचला किल्ले भ्रमंती करून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. शिवप्रेमींनी आपली नावे गणेश नाईक यांच्याकडे नोंदवावीत.
---
वेंगुर्लेत २७ पासून दीपावली शो टाईम
वेंगुर्ले ः वेंगुर्ले शहर बाजारपेठ मित्र मंडळाच्यावतीने २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ले बाजारपेठ गाडीअड्डा येथे ‘दीपावली शो टाईम’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात २७ ला सायंकाळी सातला रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि ग्रुप डान्स स्पर्धा, २८ ला सायंकाळी सातला ‘व्हरायटी शो कलाविष्कार नव्या पर्वाचा’. २९ ला सायंकाळी सातला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होणार आहे. ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यांना पैठणी द्वितीय क्रमांक विजेत्यांना सोन्याची नथ व तृतीय क्रमांक विजेत्यांना मिक्सर देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अतुल नेरुळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--
आंबेआळीत २९ ला ‘होम मिनिस्टर’
कणकवली ः दीपोत्सवानिमित्त यंगस्टार मित्रमंडळातर्फे आंबेआळी येथे २९ ऑक्टोबरला होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंगस्टारतर्फे २९ ला विविध कार्यक्रम होणार आहेत. यात सकाळी दहाला सत्यनारायण महापूजा, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी सहाला संगीत भजने, सातला ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ, तृतीय क्रमांकासाठी गॅस शेगडी अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी प्रियाली कोदे यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे.
--
पोईपमध्ये २६ ला तिरंगी भजन
मालवण ः पोईप येथील देव वेताळ मंदिर येथे बुधवारी (ता.२६) रात्री आठला तिरंगी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, आंजिवलीचे बुवा प्रवीण सुतार, डुंगो कमला भजन मंडळ, शेळपीचे बुवा दिनेश वागदेकर, लिंगेश्वर भजन मंडळ, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात हा सामना रंगणार आहे.
--------------------
उभादांडा येथे २४ ला कार्यक्रम
वेंगुर्ले ः उभादांडा-वाघ्रेश्वरवाडी येथील श्री गणपती मंदिर येथे सोमवारी (ता.२४) सायंकाळी साडेसहाला वार्षिक श्री गणपती पूजन उत्सव होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.