मत्स्य हंगाम अनिश्चिततेच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्य हंगाम अनिश्चिततेच्या गर्तेत
मत्स्य हंगाम अनिश्चिततेच्या गर्तेत

मत्स्य हंगाम अनिश्चिततेच्या गर्तेत

sakal_logo
By

57933
देवगड ः येथील नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना निवेदन देताना तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)


मत्स्य हंगाम अनिश्चिततेच्या गर्तेत

वातावरणातील बदल; परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मच्छिमार अडचणीत

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः अवकाळी, परतीचा लांबलेला पाऊस, वेळोवेळी धडकणारी समुद्री वादळे यामुळे कोकणचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जाणारा मच्छीमारी हंगाम अनिश्चितेच्या गर्तेत सापडत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे अलीकडे सातत्याने किनारी भागात याचा प्रभाव जाणवतो आणि मच्छीमार हवालदिल होतात. दरवर्षी चक्रीवादळाची टांगती तलवार मच्छीमार हंगामामध्ये पहायला मिळत आहे. यामुळे मच्छीमार सातत्याने शासनाचे दरवाजे ठोठावत असल्याचे दिसते.
गेल्या पंधरा वर्षात वेळोवेळी समुद्री वादळे झाली. काहींची तीव्रता कमी असली तरीही कमीअधिक त्याची झळ जाणवली. आजवर सर्वाधिक नुकसानकारक ठरले ते फियान, क्यार आणि तौक्ते वादळ. यामुळे किनारी भागात मच्छीमार बांधवाचे नुकसान झाले. २००९ मध्ये झालेल्या फियान वादळात तर मच्छीमार बेपत्ता होण्याचे प्रकार घडले. २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते वादळात केवळ मच्छीमारच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसला. घरे, इमारती यांच्या छपरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली. कलम बागा उध्वस्त झाल्या. यामुळे आता समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर संभाव्य वादळाच्या शक्यतेने मच्छीमारच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसह आंबा बागायतदार घाबरून असतात. आताही समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने मच्छीमार काळजीत आहेत. खरंतर देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारी भागात केरळपासून गुजरातपर्यंत पावसाळी बंदी कालावधी एकाचवेळी करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलैला बंदी कालावधी संपुष्टात येऊन १ ऑगस्टपासून मासेमारी सुरु होते; मात्र आपल्याकडे नारळी पौर्णिमा तसेच गणपती उत्सव झाल्यानंतरच मासेमारी हंगाम सुरु होतो. दसऱ्यानंतरच हंगाम रंगात येतो. तोपर्यंत अधूनमधून परतीचा पाऊस कोसळतच असतो. यंदाही हंगाम सुरु झाल्यावर पावसाळी आणि समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे स्थानिक मच्छीमार नौकांसह गुजरातमधील मच्छीमार नौका सुरक्षितता म्हणून येथील बंदरात थांबून होत्या. वातावरण निवळेपर्यंत नौका बंदरात होत्या. त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाल्याने मासेमारी थंडावली. अजूनही वातावरण पूर्णपणे निवळलेले नसल्याने धास्ती कायम आहे. आता पुन्हा एकदा समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.
..........................
चौकट
वादळाची भीती
पूर्वी पावसाळा संपल्यावर पुन्हा पावसाळा येईपर्यंत निर्धोक मासेमारी चालायची; पण गेल्या काही वर्षात समुद्री वादळाची टांगती तलवार मच्छीमार हंगामावर असते. दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये वादळ धडकले होती. त्यावेळी मासेमारी ठप्प झाली होते. त्यावेळी केरळपासून गुजरातपर्यंतच्या मच्छीमारी नौका देवगड बंदरात आश्रयाला आल्या होत्या.
.........................
मच्छिमारांना सवलतींची मागणी
देवगडमधील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देऊन लक्ष वेधले. यामध्ये तालुक्यात परतीच्या पावसाने विजांचा लखलखाट करीत धुमाकुळ घातला आहे. अचानक पावसाचा जोर वाढत असल्याने तसेच समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे देवगड बंदरातील मच्छीमारी हंगाम थंडावला आहे. सध्या पावसाळी वातारणामुळे मच्छीमारीला जाण्यामध्ये अडचणी वाढल्याने मासळीचे प्रमाण घटले आहे. अनेक मच्छीमारी नौका बंदरात थांबून आहेत. पर्यायाने स्थानिक मच्छीमारांना त्याचा फटका बसला आहे. मच्छीमारी बंदी कालावधी उठून तीन महिने होत आले तरीही अद्याप म्हणावा तसा हंगामाने जोर पकडलेला नाही. पावसामुळे एकीकडे मासेमारी थंडावली आहे तर दुसरीकडे दैनंदिन खर्च सुरूच असल्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. मासेमारी अनियमित झाल्याने स्थानिक बाजारातील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने मच्छीमारांना सवलती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
......................
लक्षवेधी ठरलेली समुद्री वादळे
फियान, वरदा, निसर्ग, क्यार, तौक्ते
...........
कोट
ग्लोबल वॉर्मिंगमूळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर गेल्या ३ ते ४ वर्षांमध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असून त्यातून वादळ छोटी मोठी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. मच्छीमारांनी बँका, मच्छिमार संस्थेकडून मोठ्या प्रमाणात कर्जे काढून व्यवसाय उभा केला आहे. पुढे वातावरण चांगले राहील व मासे मिळतील फक्त या आशेवर मच्छिमार जगत आहे. मच्छिमार संस्थांनीही बँकाकडून कर्जे घेऊन मच्छीमाराना दिली आहेत त्यामुळे संस्थाही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा प्रसंगी केंद्र व राज्य सरकारांनी मच्छीमारांच्या पाठिशी राहून त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. फियान २००९ मध्ये संस्थेच्या २ पाती ५ खलाशांसह बेपत्ता आहेत.
- अरुण तोरस्कर, व्यवस्थापक, तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था, देवगड.
.........
कोट
मच्छीमारी व्यवसाय आता परवडेनासा झाला आहे. एकेकाळी देवगड बंदर मासळी उलाढालीमुळे गजबजलेले असायचे. स्थानिक बाजापेठेतही उलाढाल वाढलेली दिसून येत होती. अलीकडे व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असतो. सध्या बंदरात मच्छीमार नौका थांबून आहेत. मच्छीमारांच्या नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने याबाबत सकारात्मक विचार करावा.
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी देवगड
.........
कोट
परतीच्या पावसामुळे किनारी भागात धुमाकूळ घातल्याने मासळी हंगाम अनियमित झाला आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असून मासळीची उलाढाल मंदावली आहे. मिळणाऱ्या मासळीचे दर मर्यादित आहेत. उपलब्ध मासळी आणि खर्च याचा मेळ बसेनासा झाला आहे. मासळी हंगाम मंदावल्याने पुरक व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
- हनिफ मेमन, मासळी उद्योजक, देवगड