रत्नागिरी- वीज पडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- वीज पडली
रत्नागिरी- वीज पडली

रत्नागिरी- वीज पडली

sakal_logo
By

५७९८०

- rat२१p२७-

नारळाच्या झाडावर वीज कोसळली
रत्नागिरीत दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाऊस; जिल्ह्यात सर्वत्र हजेरी
रत्नागिरी, ता. २१ ः परतीच्या पावसाचे सावट दिवाळीवर कायम आहे. शुक्रवारी (ता. २१) दुपारी अचानक रत्नागिरीमध्ये पडलेल्या जोरदार सरीने नागरिकांची तारांबळ उडाली. मारुती मंदिर परिसरात भरवस्तीत एका नारळाच्या झाडावर वीज पडली. झाडाच्या शेंड्याला आग लागली होती. पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ४.६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात चिपळूण १८ मिलिमीटर, संगमेश्‍वर २४ मिलिमीटर पाऊस झाला. आज दुपारपर्यंत कडकडीत ऊन होते. उष्माही जाणवत होता; मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदलाला सुरुवात झाली. आभाळ भरून आले आणि हलके वारे वाहू लागले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी शहरातील व्यापारी, नागरिक यांची तारांबळ उडाली. पावसाच्या शक्यतेने व्यापारीवर्गाकडून रस्त्यावर मांडलेली दुकाने सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ उडाली. तासाभरातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. आकाशात विजांचे तांडव सुरू होते. ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण होते. मारुतीमंदिर येथे दुकाने, लोकवस्ती असलेल्या परिसरात एका नारळाच्या झाडावर ढगांचा गडगडाट होत असताना कडकडाट होत वीज कोसळली. झाडाच्या शेंड्याच्या भागाला आग लागली. आग लागलेल्या झावळांचे किटाळ अन्य झाडांवर पडून ती वाढण्याची भीती होती. वीज पडल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर एका सजग नागरिकाने नगरपालिकेला कळवले. काही क्षणात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझवली. जिल्ह्यात भातशेती कापणीची कामे वेगाने सुरू असून पावसामुळे त्यात खंड पडत आहे. अनेक शेतकऱ्यांना कापलेले भात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. कापलेली भातं पावसात भिजून गेली. वेळीच पाऊस थांबला असला तरी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.


कापणी करून सुकवण्यासाठी
खरीप हंगामात भातपिकासाठी विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर तत्काळ संबंधित कंपनीशी संपर्क साधून पंचनामे करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केली आहे. पीक कापणी करून सुकवण्यासाठी ठेवलेले असताना कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत गारपीट, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी जे कारण असेल ते नमूद करून माहिती द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.