वहाळ आरोग्य केंद्रातील घोळात चौघेजण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहाळ आरोग्य केंद्रातील घोळात चौघेजण
वहाळ आरोग्य केंद्रातील घोळात चौघेजण

वहाळ आरोग्य केंद्रातील घोळात चौघेजण

sakal_logo
By

वहाळ केंद्रातील घोळात चौघेजण
लेखा विभाग अधिकाऱ्यांकडून चौकशी; रक्कम कमी पडू लागल्याने घोळ उजेडात
चिपळूण, ता. २१ः तालुक्यातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकाने पगार बिलात लाखोंचा घोळ घातल्याने जिल्हा परिषद लेखा विभागासह आरोग्य विभागात खळबळ उडाली. शुक्रवारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी लिपिकाच्या कारभाराची कसून तपासणी केली. या लिपिकाने नेमका कितीचा घोळ घातला ते स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या प्रकरणात आणखी काहीजणांचा समावेश आहे. त्यातील एकाने शुक्रवारी काही रक्कम जमा केल्याचेही समजते; मात्र अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगून त्यास दुजोरा दिलेला नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ येथील लिपिक दुशांत तिरमारे याने पगार बिलात घोळ घातल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्याला गुरुवारी
(ता. २०) निलंबित केले होते; मात्र लिपिकाने शासनाला नेमका किती लाखांचा गंडा घातला, याची तपासणी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषद लेखा विभागाचे अधिकारी वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले होते. दिवसभर अधिकारी कसून तपासणी करत होते.
जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ऑनलाइन मागणी केली जाते. प्रत्येक विभागातील लिपिक ऑनलाइन मागणी करतात; मात्र वहाळ येथील लिपिकाने खोटी ऑनलाइन माहिती भरून जादा पैसे काढले आहेत. नियमित वेतनापोटीची रक्कम वर्ग करूनदेखील ती कमी पडून लागल्याने लिपिकाचा प्रताप अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याने नेमका किती लाखाचा घोळ घातला याचा शोध घेतला जात आहे. शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण चौकशी झालेली नव्हती. या प्रकरणात आणखी तीन ते चारजणांचा समावेश आहे. त्यातील एकाने काही लाखांची रक्कम भरल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, कारभार एकट्यानेच केला असल्याचे संबंधित लिपिकाने कबूल केले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

चौकट
वहाळ पंचक्रोशीतून आश्चर्य
वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील घोटाळ्यात अडकलेला लिपिक हा यापूर्वी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात चतुर्थ श्रेणीत कार्यरत होता. त्याला पदोन्नत्ती मिळाल्याने वहाळ येथे लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती. नेहमी साध्या पद्धतीने वागणाऱ्यांना लिपिकाने मोठा घोळ घातल्याने वहाळ पंचक्रोशीतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौकट
याची होतेय चौकशी
* वहाळ केंद्राअंतर्गत अधिकारी, कर्मचारी
* त्यांचे एकूण वेतन व भत्ते,
* गेल्या काही महिन्यातील वेतनापोटी मागणी
* अधिकारी, कर्मचाऱ्यांना वितरित झालेले वेतन
* लिपिकाचे वेतन व त्याने जादा काढलेले पैसे