Kokan : कंत्राटींना मिळाले महिन्याचे वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
कंत्राटींना मिळाले महिन्याचे वेतन

Kokan : कंत्राटींना मिळाले महिन्याचे वेतन

मालवण : येथील पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनप्रश्नी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची सूचना केल्यानंतर काल रात्री उशिरा कामगारांना एक महिन्याचे वेतन मिळाले. दरम्यान, कामगारांनी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आभार मानले. या वेळी कार्यकर्त्यांनी कामगारांना दिवाळी फराळ देऊन त्यांच्या सोबत सदैव असल्याची ग्वाही दिली.

येथील पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे वेतन ठेकेदाराने ऐन दिवाळीच्या तोंडावर थकीत ठेवल्याने, तसेच पीएफची रक्कमही खात्यात जमा न केल्याने संतप्त बनलेल्या पालिकेच्या १६ कंत्राटी स्वच्छता कामगारांनी गेले चार दिवस अचानक बेमुदत काम बंद आंदोलन छेडले. प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कामगारांचे वेतन देण्यासाठी धनादेश दिला आहे, तरीही कामगारांना पगार मिळाला नव्हता.

वेतनाबाबत संबंधित ठेकेदाराकडून अनेकदा विलंब झाल्याने तसेच ठरलेल्या वेतनापेक्षा कमी दिल्याने, तसेच काहीवेळा वेतन थकीत ठेवल्याच्या निषेधार्थ यापूर्वीही पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी अनेकदा काम बंद आंदोलन छेडले होते; मात्र हा प्रश्न त्या-त्यावेळी काही अंशी सोडवून वेतनाबाबत पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत असल्याने कामगारांना काम बंद आंदोलनाचे हत्यार वारंवार उपसावे लागत आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे किसन मांजरेकर, विश्वास गावकर, राजा तोंडवळकर, अरुण तोडणकर उपस्थित होते.