स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स

sakal_logo
By

फोटो...००८७३ ( रेडी)

पावसाचा धुमाकूळ

- द्राक्ष, डाळिंब, भातासह खरीप, रब्बीला मोठा दणका
- कोट्यवधीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २२ ः जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. काल (ता. २१) मध्यरात्री बारानंतर सुरू झालेल्या पावसाने झोडपून काढले. येरळा, बोर नद्यांना पूर आला आहे. वाळवा, मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यांतील बहुतांश पिके पाण्यातच उभी आहेत. शिराळा तालुक्यातही दमदार पाऊस झाला. ओढे, विहिरी आणि नाले ओसंडून वाहत आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या ऊसतोडीही ठप्प झाल्या आहेत.
परतीच्या पावसाचा द्राक्ष, डाळिंब बागा, भातासह खरीप, रब्बीतील पिकांना दणका बसला. फुलोरावस्थेत आलेल्या बागांत गळ-कुज सुरू झाली आहे. खरिपाच्या काढणीला वेग आला असताना पावसामुळे सोयाबीन आणि भुईमुगाचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात पेरलेल्या शाळू ज्वारी, हरभरा पिकांनाही फटका बसला आहे. भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला. कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या १०-१२ दिवसांपासून अधूनमधून परतीचा पाऊस सुरूच आहे. गेले दोन दिवस पाऊस उघडणार, असे अंदाज असताना जोरदार पावसाने झोडपले. खानापूर, कडेगाव, जत तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यापेक्षाही परतीचा पाऊस जोरदार पडतोय. जिल्ह्यात १.२० लाख एकरावर द्राक्षबागा आहेत. सध्या फुलोरावस्थेत दहा टक्के, तर पौंगडावस्थेत असलेल्या सुमारे ४० टक्के द्राक्षबागा आहेत. येथे डाउनीचा सर्वाधिक धोका असून, बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. गुडघाभर पाण्यातून औषध फवारणी केली जाते. बहुतांश शेतात पाणी साचल्याने भाजीपाला कुजून जाण्याची भीती आहे. रस्त्याकडील उसाच्या तोडीही बंद झाल्या आहेत. कृषी विभागाने ५७ गावांत १० हजार ४०५ शेतकऱ्यांचे १८ ऑक्टोबरपर्यंत चार हजार २८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.
.......
चौकट...
वाळवा तालुक्यात ५६.४ मि.मी.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५६.४ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः मिरज २८.४ (६८४.७), जत ४.१ (६६५), खानापूर-विटा ३.४ (७९०.९), वाळवा-इस्लामपूर ५६.४ (९७२.४), तासगाव २१.५ (७४८.६), शिराळा १८.३ (१४९८.९), आटपाडी ९.३ (४८०.६), कवठेमहांकाळ १७.३ (८००), पलूस २४.९ (६६२.६), कडेगाव १४.३ (७९४.६).
........
चौकट
नुकसानीची माहिती ७२ तासांत द्या
सध्या पिकाचे गारपीट, अवेळी पाऊस, ढगफुटी अशा नैसर्गिक कारणांमुळे नुकसान होत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमासंरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह विमा कंपनीकडे माहिती सादर करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक अरुण कांबळे यांनी केले आहे.
................
चौकट...
ओला दुष्काळ केव्हा समजतात?
ठराविक क्षेत्रात काही काळ सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतमाल आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अतिवृष्टीमुळे पिके वाहून जातात, शेतमाल खराब होतो, जागोजागी पाणी साचते, शेतातील माती वाहून जाते यांसारख्या परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ असे म्हणतात. आकडेवारीत सांगायचे झाल्यास एका दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्‍त पाऊस असेल, तर अतिवृष्‍टी संबोधतात. अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाल्यास तो भाग ओला दुष्काळग्रस्त म्हणून ओळखता जातो. सध्याच्या सरकारी नियमांनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर १३ हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते; तर बागायती शेतीसाठी १८ हजार प्रतिहेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.